महामार्गावरील लाेखंडी प्लेटांसह अन्य साहित्य चाेरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:21 AM2021-07-04T04:21:26+5:302021-07-04T04:21:26+5:30
लांजा : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण काम पावसाळ्यात ठप्प असल्याने तीन ठिकाणी ठेवण्यात आलेल्या लोखंडी प्लेटा ...
लांजा : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण काम पावसाळ्यात ठप्प असल्याने तीन ठिकाणी ठेवण्यात आलेल्या लोखंडी प्लेटा व इतर साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत लांजा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या चाेरीबाबत कंपनीचे सुपरवायझर राज उज्ज्वल इंदुलकर यांनी लांजा पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डी. बी. घोरपडे असोसिएट, पुणे या कंपनीने महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा ठेका घेतला आहे. सध्या पावसाळ्यात चौपदरीकरणाचे काम बंद केल्याने वाकेड, लांजा आय. टी. आय तसेच वेरळ याठिकाणी ठेवण्यात आलेल्या ४४ हजार रुपये किमतीच्या ४४ लोखंडी प्लेटा, २७ हजार रुपये किमतीचे ३९ लोखंडी पाईपसारख्या आकाराचे अँकर जॅक, ३ हजार २०० रुपये किमतीचे ४० सी चॅनल टाईट आकाराचे लोखंडी सोल्जर, ४ हजार २०० रुपये किमतीचे २८ सहा मीटर आणि तीन मीटर लांबीचे लोखंडी पाईप असे एकूण १ लाख १६ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. अधिक तपास पोलीस हवालदार अरविंद कांबळे करत आहेत.