अन्यथा धनगर समाज रस्त्यावर : वैभव काेकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:33 AM2021-09-26T04:33:39+5:302021-09-26T04:33:39+5:30
वाटूळ : राजापूर तालुक्यातील ताम्हाणे - धनगरवाडीच्या विकासाबाबत बाेलणारे रामचंद्र आखाडे हे मुंबईत राहतात. त्यांनी तालुक्यातील एकाही धनगरवाडीचे दर्शन ...
वाटूळ : राजापूर तालुक्यातील ताम्हाणे - धनगरवाडीच्या विकासाबाबत बाेलणारे रामचंद्र आखाडे हे मुंबईत राहतात. त्यांनी तालुक्यातील एकाही धनगरवाडीचे दर्शन घेतलेले नाही. गेली २५ वर्ष तालुक्यात रत्नागिरी जिल्हा धनगर समाज संस्था कार्यरत आहे. त्यांनी राजापूरकडे पाहण्यापेक्षा आपल्या खेड तालुक्याकडे आधी पहावे. धनगर वाड्याच्या विकासासाठी उंटावरून शेळ्या हाकू नयेत. अन्यथा धनगर समाज त्यांच्या विराेधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा जिल्हा धनगर समाज संस्था युवक जिल्हाध्यक्ष वैभव कोकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
वैभव काेकरे यांनी म्हटले आहे की, राजापूरचे आमदार राजन साळवी यांचे माध्यमातून अनेक धनगर वाड्या विकासाच्या प्रवाहात येत आहेत. यासाठी मागील दहा-बारा वर्षात कोट्यवधी रुपये रस्ता पाणी या मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी खर्ची पडले आहेत. राजापूर तालुक्यातील ताम्हाणे धनगरवाडीवर सर्वात पहिला पाण्याचा टँकर जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच धावत होता. चार वर्षांपूर्वी ही वाडी नळपाणी योजना पूर्ण होऊन टँकरमुक्त झाली आहे. अनेक धनगर वाड्यावर टँकर धावत होता, सद्य:स्थितीत तालुक्यातील सर्व धनगर वाड्या टँकरमुक्त आहेत याचे श्रेय आमदार राजन साळवी यांना जात असल्याचे काेकरे यांनी म्हटले आहे.
ताम्हाणे येथील धनगर वाडीकडे जाणारा रस्ता हा कच्या स्वरूपात असून, पावसाळा सोडल्यास या रस्त्यावर सर्व प्रकारची वाहतूक होते. ताम्हाणे येथील धनगरवाडी व तेलीवाडी या जवळजवळ असून, आखाडे हे धनगर वाडीत राहत नसल्याचेही म्हटले आहे. त्यांनी खेड येथील देवाचा डोंगर येथे वस्ती असलेल्या धनगर वाडीचा विकास करावा, असा टाेला काेकरे यांनी लगावला आहे. अजूनही रत्नागिरी जिल्ह्यात पहिला पाण्याचा टँकर खेडमधील अनेक धनगर वाड्यावर जातो याचा अभ्यास करावा, असेही सांगितले आहे. ते ज्या पक्षाचे सरचिटणीस आहेत त्यांच्याच माजी आमदाराने धनगर समाजासाठी उपयुक्त असलेली तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत निधी देण्यास विरोध केला होता, याचाही त्यांनी अभ्यास करावा, असा सल्ला काेकरे यांनी दिला आहे.