...अन्यथा वस्तीची एस. टी. सेवा बंद होणार
By admin | Published: November 21, 2014 10:28 PM2014-11-21T22:28:55+5:302014-11-22T00:13:34+5:30
निवास व शौचालय व्यवस्था नसलेल्या गावांमध्ये एस. टी.ची रात्रीची सेवा बंद करण्याचा इशारा
अडरे : चिपळूण तालुक्यात निवास व शौचालय व्यवस्था नसलेल्या गावांमध्ये एस. टी.ची रात्रीची सेवा बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना, चिपळूण आगारातर्फे देण्यात आला आहे. चालक व वाहकांसाठी निवास व शौचालय व्यवस्था उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधित प्रशासनाला सूचना देण्याबाबत संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले होते. जिल्ह्यात एकूण २०३ गावात एस. टी. बसेस रात्रवस्तीला जात असून, अद्याप १५० गावांमध्ये निवास व शौचालय व्यवस्था नाही. अनेक गावे ग्रामस्वच्छता अभियानअंतर्गत निर्मल व हगणदारी मुक्त घोषित झाल्याने वाहक व चालकांना रात्री उघड्यावर प्रात:विधीसाठी जावे लागते. याबाबत संघटनेतर्फे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चाही झाली.
शासनाने भारत स्वच्छता अभियान सुरु केले आहे. अशा परिस्थितीत चालक, वाहकांना निवास व शौचालय याची व्यवस्था असणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी व्यवस्था नसेल, अशा ठिकाणी रात्रवस्तीला जाण्यास कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. ग्रामीण भागात निवास व शौचालय व्यवस्था होणे आवश्यक असून संबंधित प्रशासनाला सूचना देण्यात यावी, अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेतर्फे चिपळूण विभागीय अध्यक्ष रवींद्र लवेकर यांनी दिले आहे. (वार्ताहर)