रत्नागिरी जिल्ह्यात नव्या १,४३७ शिक्षकांपैकी फक्त १६ स्थानिक, टीईटी परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 12:00 PM2024-09-25T12:00:09+5:302024-09-25T12:00:26+5:30
राज्यस्तरावर ‘मेरिट लिस्ट’ नाहीच
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील रिक्त जागांसाठी १,४३७ शिक्षकांची भरती करण्यात आली. मात्र, या भरतीत स्थानिक केवळ १६ उमदेवारांचा समावेश असल्याचे समाेर आले आहे. टीईटी परीक्षेत स्थानिक उमेदवारांचा कस लागत नसल्यानेच भरती प्रक्रियेत स्थानिकांचा समावेश कमी असल्याचे बाेलले जात आहे.
शासकीय भरतीमध्ये स्थानिकांनाच संधी द्या, अशी मागणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकडून सातत्याने सुरू आहे. या मागणीसाठी शिवसेनेने आंदोलनही केले होते. त्यानंतर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी परजिल्ह्यातील उमेदवारांना हजर न करून घेण्याचा निर्णयही घेतला होता. दरम्यान, शिक्षक भरती व अन्य कर्मचाऱ्यांची भरती राज्यस्तरावर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा फटका स्थानिकांना बसत आहे.
जिल्ह्यात दाेन महिन्यांपूर्वी झालेल्या शिक्षक भरतीमध्ये १,४३७ उमेदवारांची भरती करण्यात आली. मात्र, या भरतीमध्ये स्थानिक उमेदवार केवळ १६ हाेते. शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या टीईटी परीक्षेत स्थानिक उमेदवार उत्तीर्ण हाेण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे स्थानिक उमेदवारांची भरती हाेत नाही. शैक्षणिक गुणवत्तेत इतर जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्हा अग्रेसर असूनही टीईटी परीक्षेत उमेदवार का टिकत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रक्रिया बदलली
वर्ष २००४ पूर्वी कोकण निवड मंडळ होते. त्यावेळी नोकर भरतीमध्ये ८० टक्के स्थानिकांसाठी २० टक्के इतर जिल्ह्यांतील उमेदवार भरण्याची तरतूद होती. त्या कालावधीत हजारो स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळाले हाेते. आता प्रक्रिया बदलल्याने स्थानिकांना संधी मिळत नाही.
राज्यस्तरावर ‘मेरिट लिस्ट’ नाहीच
शासनाकडून नोकर भरतीसाठी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. या एजन्सीकडून भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात येते. मात्र, राज्यस्तरावर ‘मेरिट लिस्ट’ जाहीर करण्यात येत नाही. त्यामुळे उमेदवार कुठे कमी पडले याची माहिती मिळत नाही.
नियुक्त शिक्षकांची भाषाच कळत नाही
नियुक्त झालेल्या शिक्षकांची अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भाषाही समजत नाही. त्याचा परिणाम शाळेच्या गुणवत्तेवर हाेणार आहे. त्यामुळे पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे वाढला आहे.