सात गावांपैकी पूनस गावानेच उभारला विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:21 AM2021-06-22T04:21:34+5:302021-06-22T04:21:34+5:30
अनिल कासारे लांजा : महाराष्ट्र शासनाच्या ‘माझा गाव, माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत तालुक्यातील २ हजारहून जास्त लोकसंख्या असलेल्या सात गावांपैकी ...
अनिल कासारे
लांजा : महाराष्ट्र शासनाच्या ‘माझा गाव, माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत तालुक्यातील २ हजारहून जास्त लोकसंख्या असलेल्या सात गावांपैकी पूनस ग्रामपंचायतीने प्रथम संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरु केला आहे.
लांजा तालुक्यात एकूण ७ गावांची लोकसंख्या २ हजारहून अधिक आहे. त्यापैकी केवळ पूनस गावानेच संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरु केला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर कोरोना रुग्ण मनामधून खचतो, घाबरतो़ तसेच आपल्यावर घरामध्येच उपचार करण्यात यावेत, अशी त्याची इच्छा असते. मात्र, कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने घरामध्ये उपचार करणे धोकादायक आहे. त्यामुळे शासनाने कोरोनाची लक्षणे व गंभीर नसलेल्या रुग्णांना, कोरोनाची लागण झाल्यानंतर दडपण आलेल्या रुग्णांमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास वाढावा, यासाठी ‘माझे गाव माझी जबाबदारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत गावातच विलगीकरण कक्ष सुरु करण्याला चालना दिली आहे. त्यामुळे रुग्णांवर गावातच उपचार करून त्यांना धीर देणे शक्य आहे.
लांजा तालुक्यात प्रभानवल्ली गावची लोकसंख्या २,६१४ आहे तर मठ असोडे ग्रुप ग्रामपंचायतीची २,८४४, भांबेड २,९९३, गवाणे २,८०९, वेरवली ३,२७९, पूनस २,१९०, देवधे २,२३७ इतकी आहे. या सात गावांपैकी केवळ पूनस ग्रामपंचायतीने संस्थात्मक विलगीकरण कक्ष शाळेत सुरु केला आहे. गवाणे ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने तेथे प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील २ हजारहून जास्त लोकसंख्या असलेल्या ५ ग्रामपंचायतींनी संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरु करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत.
------------------------------------
सध्या गावामध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी असली तरी गावातील ग्रामस्थांना संस्थात्मक विलगीकरण केंद्र मठ कडूवाडी शाळेत सुरु करण्यात येणार आहे. रुग्णांना आवश्यक असलेल्या सुविधा यांचा उपलब्ध करण्यास सुरुवात केली गेली आहे़
- सुषमा साळवी, सरपंच, मठ - असाेडे ग्रुप ग्रामपंचायत़
-------------------------
भांबेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. भांबेड गावातील महसूल गावानिहाय उपलब्ध असलेल्या शाळामध्ये कोरोनाच्या रुग्णासाठी संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरुवात करण्यात आले आहे़ ज्या महसूल गावामध्ये कोरोना रुग्ण आढळून येथील येथेच संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे़
- राजेंद्र गांधी, उपसरपंच, भांबेड