कडक लॉकडाऊनमध्ये राजापुरात कोरोना संसर्गाचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:40 AM2021-06-09T04:40:00+5:302021-06-09T04:40:00+5:30
राजापूर : कडक लॉकडाऊन करूनही राजापूर तालुक्यात ग्रामीण भागात झोलेला कोरोनाचा उद्रेक निश्चितच राजापूरकरांसाठी चिंतेची बाब ठरणार आहे. कोरोनाच्या ...
राजापूर : कडक लॉकडाऊन करूनही राजापूर तालुक्यात ग्रामीण भागात झोलेला कोरोनाचा उद्रेक निश्चितच राजापूरकरांसाठी चिंतेची बाब ठरणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राजापूर तालुक्यात कोरोना संसर्गाचा आलेख चढताच राहिला आहे़ जनतेची बेफिकीरी आणि शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांसह खासगी डॉक्टरांनी कोरोना तपासणीबाबत केलेले दुर्लक्ष कारणीभूत असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांसह राजापूर शहर आणि ग्रामीण भागातील काही खासगी डॉक्टरांचा आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांवर तात्पुरत्या स्वरूपात उपचार करून दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे़ ताप, सर्दी-खोकलासदृश लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांची तत्काळ कोरोना चाचणी करण्यासाठी वा तशी नोंदणी करून शासकीय रुग्णालयात पाठविणे आवश्यक असून, तरच भविष्यात कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे.
कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात सुरक्षित तालुका अशी राजापूर राजापूर तालुक्याची ओळख होती. मात्र, कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत राजापूर तालुक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाला आहे. सध्या तालुक्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा २ हजार ८६९ वर पोहोचला असून ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ९३१ इतकी आहे. उपचारांती बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या १ हजार ८१९ इतकी आहे तर आजपर्यंत तालुक्यात दुदैवाने ११९ जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे.
शिमगोत्सवानंतर तालुक्यातील कोरोना संसर्गाचा आलेख चढता राहिला आहे. त्यानंतर लग्नसमारंभ, दिवसकार्य व अन्य कार्यक्रमांत होणाऱ्या गर्दीवर ग्रामीण भागात कोणतेच नियंत्रण न राहिल्याने कोरोनाचा प्रसार वेगाने झाला आहे. पेंडखळे, कळसवली, ओझर, भू, मंदरूळ, करक, नाणार, प्रिदावण, कुंभवडे यांसारखे भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत ज्याप्रमाणे ग्रामकृती दलांनी अतिदक्षतेने काम करणे गरजेचे आहे.
शासनाच्या नियमाप्रमाणे आपल्याकडे आलेल्या सर्दी, ताप व खोकल्याच्या रुग्णांबाबत तत्काळ ग्रामीण रुणालयात रिपोर्ट करणे आवश्यक असताना व तसा आदेश असतानाही काही खासगी डॉक्टरांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. आजही अनेक खासगी डॉक्टर त्यांच्याकडील रुग्णांची माहिती देत नसल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री यांनी सांगितले.
-----------------------
सार्वजनिक कार्यक्रम बंद ठेवा
राजापूर तालुक्यात वाढता कोरोना संसर्गाचे कारण हे लग्नसमारंभ व विनाकारण होणारी गर्दी हेच असल्याचे सध्यातरी पुढे आले आहे. त्यामुळे भविष्यात हा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनतेने लग्न, दिवसकार्य, वाढदिवसासारखे सार्वजनिक कार्यक्रमांना फाटा देणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमांना येणारे नातेवाईक, पै-पाहुणे यामुळे होणारी गर्दी यामुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढण्याची शक्यता आहे़