नाखरे शाळेत गुणवत्ता वाढीसह सर्वांगिण विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 05:20 PM2020-02-17T17:20:54+5:302020-02-17T17:21:27+5:30
ब्रिटीशकालीन सरकारमान्य जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, नाखरे क्रमांक १ येथे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबर सर्वांगिंण विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पहिलीची पूर्वतयारी फेब्रुवारीपासून केली जात असून, दहावी, बारावी पॅटर्नप्रमाणे सातवीची परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थी संस्कारासाठी उपक्रम राबवून, सर्वांगिण विकास, पायाभूत सुविधांसाठी विशेष तयारी करून घेण्यात येत असल्यानेच ग्रामीण भागातील ही शाळा आदर्शवत ठरली आहे.
मेहरून नाकाडे
रत्नागिरी : ब्रिटीशकालीन सरकारमान्य जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, नाखरे क्रमांक १ येथे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबर सर्वांगिंण विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पहिलीची पूर्वतयारी फेब्रुवारीपासून केली जात असून, दहावी, बारावी पॅटर्नप्रमाणे सातवीची परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थी संस्कारासाठी उपक्रम राबवून, सर्वांगिण विकास, पायाभूत सुविधांसाठी विशेष तयारी करून घेण्यात येत असल्यानेच ग्रामीण भागातील ही शाळा आदर्शवत ठरली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा यासाठी शाळेत अव्यक्त ते अभिव्यक्त उपक्रम राबविण्यात येतो. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी सृजन शनिवार हा आनंददायी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्या अंतंर्गत क्षेत्रभेट, चित्रकला, मनोरंजक बुद्धीवर्धक खेळ, संस्कारपर मार्गदर्शन, कागदकाम कार्यशाळा, कविता लेखन आदी व्यक्तीविकासपूरक उपक्रम शाळेत राबविण्यात येतात. शारीरिक कसरतीमध्ये मनोरे, मैदानी खेळ, योगाभ्यास यांचेही मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांची मूलभूत अभ्यास कौशल्ये आणि संस्कारक्षम वातावरणासाठी शिक्षक विशेष मेहनत घेत आहेत.
गावच्या मध्यावर असलेल्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. त्यांच्या दप्तराचे ओझे कमी व्हावे, यासाठी त्यांना पुस्तकांचे दोन सेट देण्यात आले आहेत. शनिवारीदप्तराविना शाळा उपक्रम राबविण्यात येत आहे.
संस्कारगंध कार्यक्रमाद्वारे श्रवणकौशल्य विकसनावर भर दिला आहे. पालकत्त्वाचे प्रशिक्षण, महिला मेळावा, एक दिवस शाळेसाठी, तणावमुक्त वातावरण, बोलके फळे, वर्ग व्यवस्थापनात विद्यार्थी सहभाग, उपस्थिती प्रमाणपत्र, समयदान अशा विविध उपक्रमांचे फलित विद्यार्थ्यांची प्रगती आहे. त्यामुळेच ही शाळा आदर्शवत ठरली आहे.
शिक्षकांनी तन, मन,धन अर्पून शाळेचा कायापालट केला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर दिला जात असून, पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये जिव्हाळा निर्माण होऊन सातवीचे विद्यार्थी आठवीचा वर्ग सुरू करण्यासाठी आग्रह करीत आहेत.
- मोहन जाधव, पालक
विविध उपक्रम राबविताना पालक, ग्रामस्थांचे योगदान लाभते. वाढदिवसाला पुस्तके भेट देण्याच्या संकल्पनेतून सुसज्ज वाचनालय तयार झाले आहे. भाऊबीज भेट व शैक्षणिक उठाव यातून शाळेचे भौतिक रूप पालटण्यात आले आहे.
- गोपाळ रोकडे, मुख्याध्यापक