सर्वदूर पोहोचलेल्या एस. टी.ला नुकसानीचा दणका
By admin | Published: December 22, 2014 12:17 AM2014-12-22T00:17:49+5:302014-12-22T00:17:49+5:30
परिवहन महामंडळ : सलग तीन वर्षे नफ्यात असलेली एसटी नुकसानीत
रत्नागिरी : खासगी वाहतुकीशी करावी लागणारी स्पर्धा, लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाढलेली वाहतूक शिवाय गेल्या वर्षातील डिझेल दरवाढ या सर्वांचा परिणाम म्हणून रत्नागिरी विभाग गेले दोन वर्षे तोटा सहन करीत कारभार हाकत आहे. २००९ पासून २०१२ पर्यंत सलग तीन वर्षे फायद्यात असलेला रत्नागिरी विभाग मात्र गेली दोन वर्षे कोट्यवधीचा तोटा सोसत आहे.
रत्नागिरी जिल्हा भौगोलिक दृष्ट्या वाडी वस्त्यांवर, डोंगर दऱ्यातून वसलेला आहे. ग्रामीण भाग शहराशी एसटीद्वारे जोडण्यात आला आहे. ग्रामीण भागामध्ये खासगी प्रवासी वाहतुकीचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे एसटीला खासगी प्रवासी वाहतुकीशी दररोजची स्पर्धा करावी लागत आहे. एसटीची प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालल्याने तोट्यातील कारभार हाकावा लागत आहे.
गेल्या वर्षभरामध्ये डीझेलचे दर भरमसाठ वाढले परंतु येत्या सहा महिन्यात ते कमी झाल्यामुळे एसटीला त्याचा लाभ झाला आहे. हा तोटा भरुन काढण्यासाठी प्रवासी वाढवा मोहीम राबविण्यात येत आहे. वेळेवर गाड्या सोडणे, स्थानकातील स्वच्छता, कामगारांकरिता पास योजना, आवडेल तेथे प्रवास योजना, त्रैमासिक, मासिक पासांची उपलब्धता आदी विविध योजना राबवून प्रवाशांना आकर्षित करण्याचे काम महामंडळ करीत आहे. तरीदेखील एस. टी.ची सेवा गेल्या काही वर्षात खूपच कोलमडलेली आहे. एस. टी.ची देखभाल दुरुस्तीही होत नाही, त्याचप्रमाणे एस. टी.चे अपघातही वाढल्याने अनेक प्रवाशांनी एस. टी.कडे पाठ फिरवली आहे.
सन २००९ - १०मध्ये चार कोटी ६७ लाख ६० हजार, २०१०मध्ये १ कोटी २० लाख ३१ हजार, २०११-१२मध्ये २ कोटी ६९ लाख २४ हजार रुपयांचा नफा मिळवलेल्या रत्नागिरी विभागास २०१२-१३ मध्ये १९ कोटी १ लाख ८३ हजार तर १३ - १४ मध्ये ४० कोटी ८८ लाख ४८ हजाराचा तोटा सोसावा लागला आहे.
हा तोटा भरुन काढत असतानाच कर्मचाऱ्यांवरती दुहेरी ड्युटीचा वाढलेला ताण कमी करण्याकरिता नवीन वाहकांची नियुक्ती तसेच जुन्या नादुरुस्त गाड्या भंगारात काढल्या जात आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये सेवेचा दर्जाच घसरल्याने एस. टी.ची विश्वासार्हता कमी होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)