Ganpati Festival - दिव्यांगत्त्वावर मात- बांधाच्या मातीपासून शिकला गणेशमूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 12:27 PM2020-08-21T12:27:45+5:302020-08-21T12:29:12+5:30
अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर दिव्यांगत्त्वावरही मात करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे राहुल चंद्रकांत गोळपकर. लहानपणी बांधाच्या मातीपासून मूर्ती करण्याची कला अवगत केलेला राहुल आता गणपतीच्या सुबक मूर्ती रेखाटतो. दिव्यांग असूनही आत्मनिर्भर कसे व्हावे, हे राहुलकडूनच शिकावे.
अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर दिव्यांगत्त्वावरही मात करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे राहुल चंद्रकांत गोळपकर. लहानपणी बांधाच्या मातीपासून मूर्ती करण्याची कला अवगत केलेला राहुल आता गणपतीच्या सुबक मूर्ती रेखाटतो. दिव्यांग असूनही आत्मनिर्भर कसे व्हावे, हे राहुलकडूनच शिकावे.
रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली - पारवाडी येथे राहुल राहतो. लहानपणापासूनच तो मूकबधीर आहे. तर एका कानाने त्याला ऐकताही येत नाही. आपल्यातील कमतरता त्याने जगण्याच्या आड कधीच येऊ दिली नाही. लहानपणी शेताच्या बांधापासून गणेशमूर्ती करण्याची त्याला आवड जडली. त्यातून हळूहळू तो शाडूच्या मातीची गणेशाची मूर्ती तयार करू लागला. मूकबधीर शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्याला त्यातील बारकावे शिकायला मिळाले. आज तो गणेशाच्या मूर्ती स्वत: रेखाटतो.
एका कारखान्यातील काम आटोपले की, दुसऱ्या कारखान्यात काम करण्यास तो पुन्हा तयार असतो. गणेशमूर्तीच्या कलेबरोबरच राहुल सुतारकाम आणि वेल्डिंगचेही काम करतो. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तो घरातही मदत करतो. राहुल याच्या चिकाटीने आत्मनिर्भरतेचा खरा संदेश दिला.
तहान-भूक विसरतो
राहुल सहाव्या वर्षापासून मूर्तीकला शिकला. गेली ६ वर्षे तो सुरेश करंजगावकर यांच्या कारखान्यात काम करतो. तर कधी मूर्ती सजावटीसाठी अन्य ठिकाणी जातो. हे काम करताना तो तहान-भूक विसरून रात्रभर मग्न राहतो.
घरच्यांचेही पाठबळ
राहुलची घरची परिस्थिती बेताचीच आहे. आई, वडील, भावासोबत राहणाऱ्या राहुलला घरच्यांचे पाठबळ मिळते. तो घरातील गणपती स्वत:च काढतो. तर गावातील देवीची मूर्तीही रेखाटतो. मोठ्या मूर्ती रेखाटण्याची त्याची प्रबळ इच्छा आहे.