मुंबई-गोवा महामार्गावर टॅंकर उलटून वायू गळती; सात तासांनी वाहतूक सुरू

By अरुण आडिवरेकर | Published: October 8, 2023 11:57 AM2023-10-08T11:57:02+5:302023-10-08T11:57:32+5:30

महामार्गावरील पूर्ण धोका टळल्यावर आज सात तासांनी वाहतूक सुरू करण्यात आली.

Overturned tanker gas leak on Mumbai-Goa highway; Traffic resumes after seven hours | मुंबई-गोवा महामार्गावर टॅंकर उलटून वायू गळती; सात तासांनी वाहतूक सुरू

मुंबई-गोवा महामार्गावर टॅंकर उलटून वायू गळती; सात तासांनी वाहतूक सुरू

googlenewsNext

रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावरील हातखंबानजीक असलेल्या चरवेली येथील वळणावर गॅसचा टँकर उलटून वायू गळती झाल्याची घटना शनिवारी रात्री ११:३० वाजता घडली. पोलिसांनी तातडीने महामार्गावरील वाहतूक बंद केली. महामार्गावरील पूर्ण धोका टळल्यावर आज सात तासांनी वाहतूक सुरू करण्यात आली.

अपघातातील गॅस टँकर (यूपी ७० सीटी ९९९९) हा वळणावर डाव्या बाजूला उलटला. अपघातानंतर टँकर चालक बिरपाल प्रेमणारायण सिंग (५७, रा. उत्तरप्रदेश) हा अडकून पडला होता. ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढून जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेने पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने अग्निशामक दल एमआयडीसी व रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला फोन करून बोलावण्यात आले. हा टॅंकर जिंदल कंपनीचा असल्याने त्यांनाही माहिती देण्यात आली.

या अपघातानंतर तातडीने महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. ती पालीजवळील बावनदीमार्गे वळवण्यात आली. जिंदल कंपनीचे तंत्रज्ञ तातडीने घटनास्थळी आले व त्यांनी गळती बंद केली. त्यानंतर आज सकाळी ६:२५ वाजता सुमारे सात तासाने महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. हातखंबा महामार्गाचे पोलिस, पाली दूरक्षेत्राचे पोलिस, तसेच रत्नागिरी येथील ग्रामीण पोलिस रात्रभर घटनास्थळी उपस्थित होते.

Web Title: Overturned tanker gas leak on Mumbai-Goa highway; Traffic resumes after seven hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.