देवरुख मातृमंदिर संस्थेला ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:25 AM2021-05-30T04:25:12+5:302021-05-30T04:25:12+5:30
रत्नागिरी : फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनने एक पाऊल पुढे टाकत देवरुख मातृमंदिर संस्थेला ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर (१० ...
रत्नागिरी : फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनने एक पाऊल पुढे टाकत देवरुख मातृमंदिर संस्थेला ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर (१० लीटर प्रति मिनिट ऑपरेटिंग लोड) देणगी स्वरूपात देण्यात आले.
सध्या देशभरात कोविड १९ रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गावागावात कोविड सेंटर सुरू करण्यात आली आहेत. याचाच एक भाग म्हणून चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनकडे देवरुख मातृमंदिर संस्थेला वैद्यकीय उपकरणांची मागणी केली होती. ही मागणी मुकुल माधव फाउंडेशनच्या विश्वस्थ रितू प्रकाश छाब्रिया यांनी लगेचच मान्य करून २८ मे रोजी देवरुख मातृमंदिर कोविड सेंटर यांच्याकडे ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले.
या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, मातृमंदिर ट्रस्टचे सदस्य अभिजीत हेगशेट्ये, तहसीलदार थोरात, गटविकास अधिकारी रेवणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद बालाजी लोंडे, मातृमंदिराचे विश्वस्त व फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
मातृमंदिरने जवळपासच्या खेड्यांसाठी कमी खर्चात ३० बेडसाठी कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. याचा आजूबाजूच्या गावांना चांगला फायदा होत आहे. संस्थेने सुरू केलेल्या या काेविड सेंटरला हातभार लागावा, यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनने मदतीचा हात दिला आहे़ आमदार शेखर निकम आणि अभिजित हेगशेट्ये यांनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनचे आभार मानले़
-----------------
देवरूख येथील मातृमंदिर संस्थेला फिनाेलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर देण्यात आले़