लांजा, राजापूरसाठी ऑक्सिजनयुक्त दाेन काेविड रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:50 AM2021-05-05T04:50:48+5:302021-05-05T04:50:48+5:30
लांजा : लांजा, राजापूर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. आराेग्य यंत्रणाही आता हतबल हाेऊ लागली आहे. ही परिस्थिती ...
लांजा : लांजा, राजापूर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. आराेग्य यंत्रणाही आता हतबल हाेऊ लागली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड यांनी लांजा येथील देवधे कोविड सेंटरला १ व राजापुरातील रायपाटण कोविड सेंटरला १ अशा ऑक्सिजनयुक्त दोन कोविड रुग्णवाहिका जनतेच्या सेवेसाठी दिल्या आहेत.
लांजा, राजापुरात गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. रुग्ण वाढू लागल्याने त्यांना कोविड सेंटर अथवा रत्नागिरीसारख्या ठिकाणी ने - आण करण्यासाठी वाहन व्यवस्था अपुरी पडत आहे. खासगी वाहनचालक मोठ्या प्रमाणात भाडे आकारत असल्यामुळे रुग्णांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
राजापूर तालुक्यातील रायपाटण व लांजा तालुक्यातील देवधे येथील कोविड सेंटरला विधानपरिषद आमदार हुस्नबानू खलिफे आणि नवी मुंबईचे नगरसेवक अविनाश लाड, राजापूर नगराध्यक्ष जमीर खलिफे, भाई नारकर, जितू खामकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण हेगिष्टे, काॅंग्रेस जिल्हा सचिव संतोष गोताड, अनिरुद्ध कांबळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी काेविड रुग्णालयातील परिस्थितीची माहिती घेतली.
या काळात खासगी वाहतूकदाराकडून होणारी लूट थांबवण्यासाठी अविनाश लाड यांच्या माध्यमातून ना नफा ना तोटा या धोरणानुसार कोविड रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ऑक्सिजन मशीन, मास्क, सॅनिटायझर अशा विविध आवश्यक वस्तू दिल्या आहेत. या काळात कुठल्याही व्यक्तिला उपचार मिळावा, या हेतूने आपण काम करत आहोत. कुठलीही व्यक्ती उपचाराशिवाय वंचित राहू नये, असे अविनाश लाड यांनी सांगितले.
...............................
लांजा, राजापूर येथील काेराेनाग्रस्त रुग्णांची ने - आण करण्यासाठी हाेणारे हाल लक्षात घेऊन अविनाश लाड यांच्यातर्फे दाेन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत.