गुहागरमधील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:36 AM2021-08-14T04:36:41+5:302021-08-14T04:36:41+5:30
गुहागर : भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या संशोधन आणि विकास संस्थेतर्फे गुहागर शहरातील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प ...
गुहागर : भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या संशोधन आणि विकास संस्थेतर्फे गुहागर शहरातील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा राहात आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, गुहागर ग्रामीण रुग्णालयाबरोबरच मंडणगड, खेड, रत्नागिरी याठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची उभारणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि एचएलएल इन्फ्रातर्फे करण्यात येत आहे.
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत संशोधन आणि विकास संस्था काम करते. या संस्थेने वैद्यकीय क्षेत्रासाठी लागणारा ऑक्सिजन निर्मिती करणारा छोटा व कमी खर्चात उभा राहणारा स्वदेशी तंत्रज्ञान असलेला हा प्रकल्प संशोधनातून तयार केला आहे. कोराेनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवला हाेता. त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वी प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. देशातील ५८० ठिकाणी असे वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यासाठी केंद्र सरकारने विविध संस्थांची मदत घेतली आहे. महाराष्ट्रातील २८ ठिकाणी हा प्रकल्प उभा करण्यासाठी आवश्यक असणारे बांधकाम आणि इलेक्ट्रिफिकेशन करून देण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतली आहे.
गुहागरमधील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी हा प्रकल्प उभा करण्यात येत आहे. मुंबई - गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या एका ठेकेदाराकडे हे काम सोपविण्यात आले आहे. त्याप्रमाणे प्रकल्पाकरिता लागणारी बंदिस्त शेड उभारण्यात आली आहे. ऑक्सिजन प्रकल्प बसविण्याचे काम एचएलएल इन्फ्राटेक सर्व्हिसेस ही संस्था करत आहे. या प्रकल्पासाठी रशियातून यंत्रसामग्री आली आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास त्यासाठी जनरेटर चालवला जाणार आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविडकरिता २५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच पंधरा ऑक्सिजन बेडही आहेत. त्यामुळे गुहागरकरिता हा प्रकल्प कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी एकप्रकारे वरदान ठरणार आहे.
-------------------------
प्रति मिनिट १०० लीटर ऑक्सिजन
या प्रकल्पात पीएसए पद्धतीने हवेतील ऑक्सिजन खेचून घेऊन शुद्ध ऑक्सिजन तयार केला जाणार आहे. त्यातून प्रति मिनिट शंभर लीटर ऑक्सिजन तयार होईल. एकाचवेळी प्रति मिनिट पाच ते सहा लीटर क्षमतेने दहा ते पंधरा रुग्णांना हा ऑक्सिजन दिला जाऊ शकतो.