लसीकरणाची कासवगती; प्रत्येकालाच दाेन्ही डाेस मिळण्यासाठी लागू शकतात पाच वर्षे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:31 AM2021-07-29T04:31:14+5:302021-07-29T04:31:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी त्यावर लसीकरण हा प्रभावी उपाय असला तरीही सध्या राज्यभरच कोरोनो प्रतिबंधक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी त्यावर लसीकरण हा प्रभावी उपाय असला तरीही सध्या राज्यभरच कोरोनो प्रतिबंधक लसीचा अपुरा पुरवठा होत आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत पहिला डोस जेमतेम ४० टक्के लोकांना मिळाला असून, दोन्ही डोस केवळ ९ टक्के लोकानांच मिळाले आहेत. हाच वेग राहिला तर प्रत्येकालाच दोन्हीही डोस मिळण्यासाठी पाचपेक्षा अधिक वर्षे वाट पाहावी लागेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात १८ वर्षांवरील ११ लाख ८२ हजार इतके लाभार्थी आहेत. त्यापैकी आतापर्यंत ४ लाख ८१ हजार ३४० जणांचे लसीकरण झाले. पहिला डोस ३ लाख ७६ हजार ८५५ जणांना मिळाला तर दोन्हीही डोस मिळालेले लाभार्थी केवळ १ लाख ४ हजार ४८५ इतके आहेत.
दरदिवशी अगदी १५ हजारपेक्षाही अधिक जणांना डोस देण्याची क्षमता जिल्हा आरोग्य यंत्रणेची आहे. मात्र, सध्या लसच येत नसल्याने आता जिल्ह्यात केवळ ९ केंद्रांवर अधूनमधून लस दिली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाला खीळ बसली आहे.
लसीची प्रतीक्षाच...
जिल्ह्यात लसीचा पुरवठा वाढल्यावर लसीकरण केंद्र वाढविण्यात आली होती. परंतु, आता पुन्हा लसीचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे मुख्य ८ ते ९ केंद्रांवर अगदी ५० ते १०० एवढेच डोस दिले जात आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर जाणाऱ्या अनेक नागरिकांना लस न घेताच परत फिरावे लागत आहे. अनेकांनी पहिला डोस घेऊन अनेक महिने उलटले आहेत.
अद्याप पहिलाच डाेस मिळेना...
कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारने सर्वांनाच लस देण्याची घोषणा केली आहे. परंतु, लस उपलब्ध होत नाही. मी गेल्या कित्येक महिन्यांपासून लस घेण्यासाठी प्रयत्न करूनही अद्याप पहिलाच डोस मिळालेला नाही.
- जयवंत खापरे, करबुडे (ता. रत्नागिरी)
शासनाने १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठी लस देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी रजिस्ट्रेशन करूनही झाले आहे. मात्र, लसीकरणाची तारीख जाहीर झाल्यावर केंद्र निवडण्यासाठी नोंदणी करण्यासाठी लिंक सुरू केल्यानंतर लगेचच नोंदणी बंद होते. त्यामुळे अजूनही पहिला डोस मिळालेला नाही.
- रईस नाकाडे, नेवरे, ता. रत्नागिरी
लसीकरण का वाढेना
प्रारंभी केंद्र सरकारने आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लगेचच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेल्या व्यक्ती आणि आता अगदी १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याची घोषणा केली आहे. मात्र, दिवसेंदिवस लस अपुरी पडू लागल्याने लसीकरण मोहिमेला खीळ बसली आहे.
१३३ केंद्रांत सुरु आहे लसीकरण
जिल्ह्यातील नऊही तालुक्यांमध्ये शहरी आणि ग्रामीण भागात मिळून एकूण १३३ केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. दि. १६ जानेवारी रोजी जिल्ह्यात ५ केंद्रांवर प्रारंभ झाला. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात लाभार्थी आणि लसीचा पुरवठा वाढल्याने १७ केंद्रांवर लस दिली जात होती. त्यानंतर जिल्ह्यातील तीन उपजिल्हा रूग्णालये, ग्रामीण आरोग्य केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांसह अन्य अशा एकूण १३३ ठिकाणी लसीकरणाला सुरूवात झाली आहे. दि. १९ जुलैपर्यंत लसीकरण सुरू होते. मात्र, आता लसीचा पुरवठा अल्प झाला आहे. त्यातच दि. २० ते २४ जुलै या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे सध्या लसीकरण बंदच आहे.