मुसळधार पावसामुळे गुहागरात भातशेती पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:36 AM2021-07-14T04:36:55+5:302021-07-14T04:36:55+5:30
गुहागर : तालुक्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ऐन लावणीच्या हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने भातशेतीमध्ये पाणीच ...
गुहागर : तालुक्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ऐन लावणीच्या हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने भातशेतीमध्ये पाणीच पाणी झाले आहे.
तालुक्यात दोन दिवसांपूर्वी पावसाला सुरुवात झाल्यानंतर खोळंबलेली शेतीची कामे पुन्हा सुरू झाली आहेत. मात्र, मुसळधार पाऊस आल्याने शेतामध्ये पाणीच पाणी झाले आहे. नुकतीच लावलेली रोपे पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. काही शेतकऱ्यांनी लावलेले बियाणे पावसाअभावी वर न आल्याने वाया गेली आहेत. त्यामुळे रोपांचा तुटवडा निर्माण झाला होता. याला पर्याय म्हणून अनेकांनी इतर शेतकऱ्यांच्या शेतातील जास्तीची असलेली रोपे घेऊन लावणी केली हाेती. मात्र, पावसामुळे ती राेपेही वाया गेली आहेत. दिवसभरात तालुक्यात १५६ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये गुहागर १०६, पाटपन्हाळे १७२, आबलोली २०७, तळवली १६५, हेदवी १३२ अशी पावसाची नोंद झाली आहे.
-----------------------------
गुहागर तालुक्यात जोरदार पावसामुळे भातशेतीमध्ये पाणी घुसल्याने भात राेपे वाया गेली आहेत. (छाया : संकेत गाेयथळे)