चिपळूणच्या प्रभारी सभापतीपदी पाडुरंग माळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:31 AM2021-03-19T04:31:10+5:302021-03-19T04:31:10+5:30
फोटो : चिपळूण पंचायत समितीचे प्रभारी सभापती पांडुरंग माळी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर माजी सभापती धनश्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. ...
फोटो : चिपळूण पंचायत समितीचे प्रभारी सभापती पांडुरंग माळी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर माजी सभापती धनश्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशांत राऊत, नंदकिशोर शिर्के, दिलीप माटे, नितीन ठसाळे, प्रताप शिंदे, पप्या चव्हाण उपस्थित होते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : सभापती धनश्री शिंदे यांनी दिलेला राजीनामा प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्षांनी मंजूर केला आहे. त्यामुळे उपसभापती पाडुरंग माळी यांची प्रभारी सभापती म्हणून वर्णी लागली. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपसभापती माळी यांनी प्रभारी सभापती पदाचा पदभार स्वीकारला आहे. दीर्घकाळानंतर खाडीपट्ट्याला हे पद मिळाले आहे.
सव्वा वर्षापूर्वी झालेल्या सभापती निवडीत शिवसेनेला सव्वा वर्षाचा कालावधी मिळाला होता. महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या धनश्री शिंदे यांनी ३० डिसेंबर २०१९ रोजी सभापतीपदाचा पदभार स्वीकारला होता. मुदत संपत आल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी सभापती शिंदे यांना राजीनामा देण्याची सूचना केली होती. सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी त्यांनी पदाचा राजीनामा दिला. जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष महेश नाटेकर यांनी शिंदे यांचा राजीनामा मंजूर केला आहे. सभापतीपद रिक्त झाल्यास त्यांचा कार्यभार उपसभापतींकडे येतो. मात्र दोन दिवसात शिंदें यांचा राजीनामा मंजुरी, ना मंजुरीचे पत्र पंचायत समितीस मिळाले नव्हते. त्यामुळे उपसभापती माळी यांनी त्वरित प्रभारी पद घेण्यास नकार दिला होता.
गुरुवारी पंचायत समिती प्रशासनाने जिल्हा परिषदेत खात्री केल्यानंतर शिंदे यांचा राजीनामा मंजूर झाल्याची खात्री केली. त्यानंतर माजी सभापती धनश्री शिंदे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, राष्ट्रवादीचे गटनेते नंदकिशोर शिर्के, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप माटे, सदस्य नितीन ठसाळे, प्रताप शिंदे, माजी सभापती पप्या चव्हाण आदींच्या उपस्थितीत माळी यांनी प्रभारी सभापतीपदाचा पदभार स्वीकारला. सभापती पदाची निवड होईपर्यंत काम करण्याची संधी आहे. सर्व सदस्यांच्या सहकार्यातून शक्य तेवढी जास्तीत जास्त कामे करण्यावर भर देऊ, असा विश्वास माळी यांनी व्यक्त केला.