लांजातील पंप चाेरीचा छडा लावण्यात पाेलिसांना यश, तिघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:38 AM2021-07-07T04:38:39+5:302021-07-07T04:38:39+5:30
लांजा : रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना संशयास्पद वाटणाऱ्या तीन तरुणांची पोलिसांनी चौकशी केली असता ते पाण्याचे पंप चोरणारे ...
लांजा : रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना संशयास्पद वाटणाऱ्या तीन तरुणांची पोलिसांनी चौकशी केली असता ते पाण्याचे पंप चोरणारे अट्टल चोरटे निघाले. त्यांनी आसगे येथील कातभट्टीवरील पंप चोरीचीही कबुली दिली आहे.
लांजा शहराबरोबरच आजूबाजूच्या गावामध्ये विहिरीतील पंप चोरीला जाण्याच्या घटना घडत असल्याने लांजा पोलीस सतर्क झाले होते. रविवारी रात्री पोलीस हवालदार अरविंद कांबळे व भालचंद्र रेवणे हे लांजा दाभोळे रस्त्यावर कोर्ले फाटा येथे रविवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान गस्त घालत हाेते. त्यावेळी ॲक्टिव्हा दुचाकी घेऊन तिघे तरुण संशयास्पद घुटमळत असल्याचे लक्षात आले. त्यांनी या तिघांची चौकशी केली असता प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. पाेलिसांना त्यांच्याबद्दल संशय आल्याने पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील, राजेंद्र कांबळे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील आय काॅप युनिटचे सुनील पडळकर, सुयोग वाडकर या पथकाला बोलावले.
पाेलिसांनी सुधीर शांताराम पड्ये (३१, रा. लांजा शेवरवाडी), प्रदीप सुभाष मांडवकर (३२) तसेच नीलेश गणेश दाभोलकर (३०, दोघेही रा. आसगे, मांडवकरवाडी) यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशीसाठी पोलीस स्थानकात आणण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चाैकशी केली असता अरिफ शफीक शेख (रा. लांजा जुनी बाजारपेठ) यांच्या कातभट्टीवरील बाॅयलर पाणीपुरवठा करण्यासाठी ५० हजार रुपये किमतीचा पाण्याचा पंप, १० हजार रुपये किमतीचा डस्टिंग जुना मोटार पंप, ५ हजार रुपये किमतीचा ६ इंची पितळी वाॅल, ८ हजार रुपये किमतीचा २ इंची पाण्याचा पंप चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी झालेल्या पंप चोरीचा या तिघांचा काही संबंध आहे का, याचा शाेध पाेलीस घेत आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार अरविंद कांबळे हे करीत आहेत.