पाकव्याप्त काश्मिर प्रश्न आजही कायम : चारूदत्त आफळेबुवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 05:11 PM2020-01-09T17:11:47+5:302020-01-09T17:12:34+5:30
तत्कालीन काश्मीर संस्थानाने मागितलेल्या लष्करी मदतीच्या निमित्ताने पाकिस्तानचा पराभव करण्याची चांगली संधी भारताकडे चालून आली होती, मात्र विजय टप्प्यात आलेला असताना अचानक पुढे न जाण्याचा निर्णय तेव्हाच्या नेतृत्वाने घेतला. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला आणि तो आजही कायम असल्याचे विचार राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी मांडले.
रत्नागिरी : तत्कालीन काश्मीर संस्थानाने मागितलेल्या लष्करी मदतीच्या निमित्ताने पाकिस्तानचा पराभव करण्याची चांगली संधी भारताकडे चालून आली होती, मात्र विजय टप्प्यात आलेला असताना अचानक पुढे न जाण्याचा निर्णय तेव्हाच्या नेतृत्वाने घेतला. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला आणि तो आजही कायम असल्याचे विचार राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी मांडले.
कीर्तनसंध्या परिवारातर्फे आयोजित कीर्तन महोत्सवाचा प्रारंभ बुधवारी झाला. ह्ययोध्दा भारतह्ण या विषयावर भाष्य करताना, पहिल्या दिवशी आफळेबुवांनी स्वातंत्र्यानंतर लगेचच झालेल्या काश्मीरमधील युध्दाची गाथा उलगडली.
उत्तररंगात काश्मीर प्रश्न कसा निर्माण झाला याविषयी निरूपण करताना, दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, तरी देशातील ५६० संस्थाने भारतात विलीन व्हायला तयार नव्हती. तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी कठोरपणे प्रयत्न करून संस्थानांना भारतात विलीन व्हायला भाग पाडले. मात्र जुनागढ, हैद्राबाद आणि काश्मीर ही संस्थाने भारतात विलीन व्हायला तयार झाली नाहीत.
काश्मीरचे राजे हरिसिंह यांनी तर स्वातंत्र्यापाठोपाठ आलेला २२ ऑक्टोबर १९४७ चा दसरा स्वतंत्र राज्याचा पहिला शाही दसरा म्हणून साजरा करायचे ठरवले. त्याच दिवशी अफगाणी टोळ्यांनी श्रीनगरकडे कूच केल्याची माहिती त्यांना मिळाली. अफगाणी टोळ्यामुळे काश्मीरचे अस्तित्व धोक्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर तेथील राजांनी भारताकडे मदतीची याचना केली. त्यानुसार काही अटींवर काश्मीरला लष्करी मदत करायला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू तयार झाले.
देश नुकताच स्वतंत्र झाला असल्याने अनेक ब्रिटिश अधिकारीही भारतीय सैन्यात होते. मात्र त्यांचे धोरण पाकधार्जिणे असल्याने त्यांनी काश्मीरला मदत करण्याच्या पथकामध्ये ब्रिटिश सैन्य सहभागी होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. भारतीय सैन्याने उत्तम कामगिरी केली. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र, महावीर चक्र आणि शौर्यपदक देण्यात आले.
अफगाण टोळीने पादाक्रांत केलेला काश्मीरचा दोन-तृतीयांश भाग भारतीय सैन्याने पराक्रमाची शर्थ करून ताब्यात घेतला. राहिलेला एक तृतीयांश भाग पुन्हा मिळविण्यासाठी भारतीय सैन्याला आवश्यक असलेले पाठबळ आणि आदेश तेव्हाच्या सरकारकडून मिळाले असते, तर तो भाग तेव्हाच काश्मीरच्या ताब्यात आला असता, असेही आफळेबुवांनी सांगितले.
देशाच्या सुरक्षेपेक्षा खेळाची करमणूक आपल्याला महत्त्वाची
भारताच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. क्रिकेटचा सामना जिंकल्यानंतर विमानतळापासून क्रिकेटपटूंची शोभायात्रा निघते, मात्र १९९९ साली कारगिल युध्द जिंकल्यानंतर ते जिंकणाऱ्या जवानांची शोभायात्रा काढायचे कोणालाही सुचले नाही. देशाच्या सुरक्षेपेक्षा खेळाची करमणूक आपल्याला जास्त महत्त्वाची वाटत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.