आवाशी ग्रामदेवतेची पालखी मंदिरातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:32 AM2021-04-04T04:32:55+5:302021-04-04T04:32:55+5:30
आवाशी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करीत खेड तालुक्यातील आवाशी गावाच्या गावकऱ्यांनी ग्रामदेवतेची ...
आवाशी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करीत खेड तालुक्यातील आवाशी गावाच्या गावकऱ्यांनी ग्रामदेवतेची पालखी मंदिरातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळून ओटी भरणाचा कार्यक्रम वाडीवाडीनुसार केला जात आहे.
तालुक्यातील आवाशी गावच्या केदारनाथ या ग्रामदेवतेचा शिमगा उत्सव विविध पद्धतीने साजरा होत असतो. पौर्णिमेला सुरू होणारा शिमगा सप्तमीला शिंपणा होऊन समाप्त होत असतो. या सात दिवसांच्या कालावधीत प्रत्येक मानकऱ्याकडे पालखी वस्तीला जात असते. त्या-त्या मानकऱ्यांकडे गावातील सर्वच तरुण, आबालवृद्ध रात्री तेथे पालखी नाचविण्याचा कार्यक्रम करीत असतात. तर दिवसभर गावातील प्रत्येक गावकऱ्यांच्या घरी पालखी भेटीसाठी जात असते. मात्र यंदा या परंपरेला शासनाच्या नियमानुसार खीळ बसली असून, इतक्या वर्षांच्या इतिहासात प्रथमच पालखी मंदिरात बसवून तेथे आळीपाळीने जाऊन शासनाचे कोरोनासंबंधित सर्व नियम पाळून ओटी भरण्याचा कार्यक्रम केला जात आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शिमग्याच्या आदल्या दिवसापासून तिसऱ्या दिवसापर्यंत वेगवेगळे सुधारित आदेश दिल्याने गावकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. परिणामी शिमग्याच्या दिवशी घेतलेला निर्णय कायम ठेवत पालखी मंदिरातच ठेवण्यात आली आहे.