पाली बाजारपेठ १५ दिवस कडकडीत बंद ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:32 AM2021-05-08T04:32:36+5:302021-05-08T04:32:36+5:30
रत्नागिरी : येथे कोरोना रुग्णाची संख्या वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून ग्राम कृती दलाने शुक्रवारपासून जनता कर्फ्यू ...
रत्नागिरी : येथे कोरोना रुग्णाची संख्या वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून ग्राम कृती दलाने शुक्रवारपासून जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्व प्रकारची दुकाने, विविध अस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच विठ्ठल गोविंद सावंत व श्री लक्ष्मी पल्लीनाथ देवस्थानचे अध्यक्ष संतोष नारायण सावंतदेसाई यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
ग्राम कृती दलाची तातडीची बैठक होऊन त्यात हा निर्णय घेण्यात आला. पाली पंचक्रोशीतील समाविष्ट सर्व गावांमधील लोकांनी अत्यावश्यक काम असेल तरच पालीत यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या सूचनांचे काटेकोर पालन करावे. त्यातून कोरोना रुग्णांची संख्या थांबवण्यास मदत होणार आहे, असे आवाहन पाली कृती दलातर्फे करण्यात आले आहे.
गावात कृती दलाने घेतलेले निर्णय
१) गावात विनाकारण फिरणाऱ्यांची ॲंटिजन चाचणी करण्यात येणार आहे.
२) ३ ते १५ मे २०२१ या काळात गावातील सर्व दुकाने पूर्णवेळ बंद असणार आहेत.
३) १५ मे रोजी गावातील कोरोना रुग्णांची संख्या बघून ग्राम कृती दल १६ मेनंतर काय करायचे याचा निर्णय घेणार आहे.
४) बंद कालावधीत कोणतीही दुकाने उघडी आढळल्यास त्यांना ५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल.
५) या कालावधीत दूध, भाजी, मासे, मटण, चिकन व हार्डवेअर विक्रेत्यांची दुकाने बंद राहतील. त्यांनी दुकाने उघडी ठेवल्यास त्यांना ५ हजार रूपये दंड केला जाईल.
६) मेडिकल दुकाने सकाळी ९ ते ११ व दुपारी ५ ते ७ वाजेपर्यंत सुरू राहतील.