औरंगाबाद येथील फरारी आरोपी पालीत अटकेत
By admin | Published: January 23, 2016 11:24 PM2016-01-23T23:24:24+5:302016-01-23T23:24:24+5:30
अनेक गुन्हे : बाजारपेठेत फिरत असताना केली कारवाई
पाली : औरंगाबाद शहरातील सिडको पोलीस ठाण्यात अनेक अत्यंत गंभीर गुन्ह्यांची नोंद असणारा महत्त्वाचा फरारी असणारा आरोपी पाली पोलीस दूरक्षेत्राच्या चाणाक्ष कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पाली बाजारपेठेत फिरत असताना पकडला. यानंतर औरंगाबाद पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात त्याला देण्यात आले.
यासंदर्भात पाली पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेल्या माहितीनुसार गतवर्षी औरंगाबाद शहरातील सिडको पोलीस ठाण्यामध्ये आरोपी रघुनाथ बन्सीलाल मानधाने (७०, भीमणी, ता. जि. उस्मानाबाद) याच्यावर भा. दं. वि. क. ३७६, ३०७, ३७७, ३७०, १०९ व बालके कायदा कलम ५, ६, १२, १६, १७ अन्वये गुन्हा दाखल झालेला होता. या गंभीर गुन्ह्यांच्या तपासकामी औरंगाबाद पोलिसांना त्याची आवश्यकता होती. परंतु जामीनावर बाहेर असताना तो तेथून पोलिसांच्या नजरेआड होऊन फरार झाला होता. पोलिसांची चाहुल लागताच सहा ते सात वेळा त्याने पोलिसांना हुलकावणी दिलेली होती. तेथून तो पुन्हा नवीन जागी स्थलांतर करत होता. त्यामुळे पोलिसांनी तपासकामी अत्यंत आवश्यक असणाऱ्या फरारी आरोपीचे छायाचित्र व माहिती व्हॉट्सअॅपद्वारे सर्व पोलिसांना कळवली होती. त्याच्या आधारे पाली बाजारपेठेत गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना एक संशयास्पद हालचाली करणारी व्यक्ती आढळली. त्याची अधिक चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु व्हॉट्सअॅपवरचे त्याचे छायाचित्र दाखवल्यावर त्याने आपली खरी माहिती दिली. यावरून त्याला पाली पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ ताब्यात घेऊन औरंगाबाद पोलिसांना त्याची माहिती दिली. पाली पोलीस प्रशासनाने ताबडतोब औरंगाबाद पोलिसांना संशयित आरोपी ताब्यात घेण्यासाठी बोलावले. त्यांनी येऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पाली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता भोसले, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कदम यांनी ग्रामीण पोलीस निरीक्षक महेश थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी केली. (वार्ताहर)