पन्हाळेकाझीत घराला आग; एकाचा होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 07:05 PM2019-06-08T19:05:32+5:302019-06-08T19:07:31+5:30
तालुक्यातील पन्हाळेकाझी बोरवाडी येथील घराला आग लागून शशिकांत दत्ताराम पेडणेकर यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी ७ वाजता ही घटना घडली.
शशिकांत पेडणेकर यांची पत्नी शकुंतला या आजारी असल्याने कुळवंडी खेड येथे माहेरी असतात. शशिकांत लोटे येथे मिस्त्री काम करत होते. बोरवाड़ी येथे त्यांचे जुने घर आहे. पावसापूर्वी घराची तयारी करण्यासाठी ते दोन दिवसांपूर्वी पन्हाळेकाझी गावात आले होते. शशिकांत पेडणेकर यांचे आई-वडील वयोवृद्ध आहेत. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असून, कुटुंबाचा पोशिंदा गेल्यामुळे पेडणेकर कुटुंबाला शासनाकडून मद्त मिळावी असी मागणी केली जात आहे. बोरवाड़ीत केवळ तीन घरे आहेत. वाडी गावापासून लांब आहे शशिकांत पेडणेकर यांचे घर थोड्या अंतरावर आहे. आजूबाजूला घरे नसल्याने आग दिसली नाही. मात्र तब्बल दोन तासांनी सुनिता बबन जाधव यांनी ही आग पाहिली. परंतु त्यापूर्वीच शशिकांत होरपळून मृत्यु पावले होते. घराकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने शासकीय यंत्रणा पोहचायला विलंब झाला. पोलिस, महसूल कर्मचारी पायपीट करत घटनास्थळी पोहचले. शववाहिनी घटनास्थळी पोहचु शकली नाही. दत्ताराम पेडणेकर यांचा मोठा मलगा नदीत वाहून जाऊन मृत्यु झाला होता. आता दुसरा मलगा जळून मृत्युमुखी पडल्याने पेडणेकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.