मंडणगडात कोरोना चाचणीच्या लक्ष्यांकपूर्तीसाठी दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:33 AM2021-07-28T04:33:29+5:302021-07-28T04:33:29+5:30
प्रशांत सुर्वे मंडणगड : जिल्हा आरोग्य विभागाने मंडणगड तालुक्यास दिलेल्या कोरोना चाचण्यांच्या लक्ष्यांकाच्या पूर्तीसाठी स्थानिक आरोग्य विभाग चांगलाच ...
प्रशांत सुर्वे
मंडणगड : जिल्हा आरोग्य विभागाने मंडणगड तालुक्यास दिलेल्या कोरोना चाचण्यांच्या लक्ष्यांकाच्या पूर्तीसाठी स्थानिक आरोग्य विभाग चांगलाच सक्रिय झाला आहे. लसीकरण आघाडीवर लक्ष्यांकपूर्तीची तालुक्याची गाडी मागे पडलेली असताना सोमवारी शहरातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रवेशद्वाराशी अँटिजन चाचणी करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक सक्रिय झाले आहे. बँकिंग व्यवहारासाठी बँकेत येणाऱ्या प्रत्येकास ही चाचणी करणे अनिवार्य करण्यात आल्याने नागरिकांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून नाराजीचा सूर उमटत आहे.
बँकेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी चाचणी करावी यासाठी सर्व ए.टी.एम. सेंटरही या काळात बंद ठेवले आहेत. चार दिवसांच्या धुवाधार पावसानंतर तालुक्याचे जनजीवन सुरळीत होऊ लागलेले आहे. महाड, खेड, चिपळूण शहरात असल्याने नातेवाइकांना मदत करण्यासाठी तालुकावासीयांना रोख रकमेची गरज आहे. ही रक्कम आणण्यासाठी जाताना बँकेच्या दारावर आरोग्य विभागाचे कर्मचारी हातात तपासणीच्या काड्या घेऊन उभे असल्याने बँकेत येणाऱ्या नागरिकांची पळापळ सुरू झाली आहे. बँकेत जायचे असल्यास आधी चाचणीची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असताना यापूर्वी चाचणी केलेल्या नागरिकांची दुबार, तिबार चाचणी सक्तीने करण्यात येत आहे.
यासंदर्भात गेल्या पंधरा दिवसांत तालुक्यातील कोणत्या नागरिकांची चाचणी केली आहे अथवा नाही, याचे कोणतेही अपडेट रेकॉर्ड आरोग्य विभागाकडे नसल्याचा प्रकार पुढे आला. जिल्ह्याला दिलेल्या लक्ष्याची पूर्ती करण्यासाठी आरोग्य विभागाने काढलेला पर्याय तालुकावासीयांसाठी गैरसोयीचा ठरत आहे. बँकेत बसण्यापेक्षा तालुक्यात गावागावांत, वाडी कोंडावार जाऊन चाचण्या करण्याचा पर्याय पुढे येत असून, आरोग्य विभागाने आपल्या कामाचा भार कमी करण्यासाठी तालुकावासीयांनी वेठीस धरू नये, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
-----------------------------------
चाचण्या करताय अहवाल कुठाय
तालुक्यात दररोज तीनशे ते चारशे चाचण्या केल्या जात असताना चाचण्यांचे निकाल त्वरित उपलब्ध करून देण्यास मात्र आरोग्य विभाग अपयशी ठरला आहे. रत्नागिरी येथील कोरोना चाचणी लॅबच्या रोजच्या तपासणी अहवालांच्या क्षमतेच्या वर अहवाल गोळा होत असल्याने तालुक्याचा अहवाल विलंबाने येत आहे. तीनशेहून अधिक अहवाल मिळणे बाकी आहे. तालुक्याची लसीकरण मोहीम ६३ टक्के इतकी पूर्ण झाली आहे.