बिबट्यांची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:31 AM2021-03-18T04:31:10+5:302021-03-18T04:31:10+5:30
गणपतीपुळे : परिसरातील भगवतीनगर, निवेंडी येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा मुक्त संचार सुरु आहे. अंधार होताच सायंकाळी ही ...
गणपतीपुळे : परिसरातील भगवतीनगर, निवेंडी येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा मुक्त संचार सुरु आहे. अंधार होताच सायंकाळी ही बिबट्याची जोडी गावात मुक्त संचार करीत असून, श्वानांची शिकार करीत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून, वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
कार्यक्रम रद्द
दापोली : तालुक्यातील उटंबर येथील हजरत पीर बाबा याकुब सरवरी दर्गा यांचा सालाबादप्रमाणे उरुस कार्यक्रम दिनांक २० मार्च रोजी होणार आहे. मात्र, कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करण्यात येणार असून, उरुसानिमित्त अन्य कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मानकऱ्यांच्या उपस्थितीत केवळ धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
आराखड्याला मान्यता
रत्नागिरी : शहरालगतच्या मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या ब्रेक वॉटर वॉल आराखड्यास पुण्याच्या केंद्रीय पाणी व ऊर्जा संशोधन केंद्राने मान्यता दिली आहे. यामुळे मिऱ्या बंधारा व ब्रेक वॉटर वॉल या दोन्ही कामांचा एकत्र प्रस्ताव सीआरझेड विभागाकडे पाठविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
टेंभ्येची पालखी रत्नागिरीत
रत्नागिरी : तालुक्यातील टेंभ्ये गावचा शिमगोत्सव शासकीय नियमावलींचे पालन करून साजरा करण्यात येणार आहे. श्री देव भैरी जुगाईची पालखी दिनांक २८ मार्च रोजी १२ वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाला भेटण्यासाठी रत्नागिरीत येणार आहे. पालखी मार्गक्रमणात आरती किंवा ओटी स्वीकारली जाणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
स्पर्धेचे आयोजन
चिपळूण : वणवामुक्त कोकण संघटनेच्या माध्यमातून कोकणातील वणव्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या मोहिमेचा एक भाग म्हणून वणवामुक्त गाव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. चिपळूण परिसरातील १६ गावांना स्पर्धेत सहभागी करुन घेण्यात आले आहे. विजेत्या प्रथम तीन क्रमांकांसह उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना रोख रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
एकाच दिवशी परीक्षा
रत्नागिरी : राज्य सेवा (एमपीएससी) आयोगाची पूर्व परीक्षा व रेल्वेभरती (आरआरबी) बोर्डाची परीक्षा दिनांक २१ मार्च रोजी एकच दिवशी वेगवेगळ्या केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या आडमुठ्या निर्णयामुळे दोन परीक्षांपैकी कोणतीही एकच परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे.