पंधरामाड धूप बंधारा कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:37 PM2017-07-24T18:37:42+5:302017-07-24T18:37:42+5:30
भागातील ४० कुटुंबीयांचे जीव मुठीत
आॅनलाईन लोकमत
रत्नागिरी, दि. २४ : रत्नागिरी शहरातील पंधरामाड भागातील सागरी धूप प्रतिबंधक बंधारा उधाण भरतीच्या तडाख्यात सापडून अधिकच कोसळला आहे. किनाऱ्याला धडक देणाऱ्या महाकाय सागरी लाटांमुळे धूपप्रतिबंधक बंधारा जागोजागी खचला आहे. अनेक ठिकाणी बंधाऱ्याला भगदाड पडले आहे, यामुळे या भागातील ४० कुटुंबीयांना जीव मुठीत धरून जीवन जगावे लागत आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कोट्यवधी रुपये खर्च करूनही या धूपबंधाऱ्याचे काम योग्यरित्या झालेले नाही. मिकरवाडा बंदराच्या सुरक्षिततेसाठी सागरात उभारण्यात आलेल्या वाय आकाराच्या ब्रेक वॉटर वॉलमुळेही पंधरामाड व मिऱ्या किनाऱ्याकडे पाण्याचा करंट वाढल्याने पंधरामाडसह मिऱ्या गावही सागरी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याचा आरोप येथील स्थानिकांकडून केला जात आहे.
शहरातील पंधरामाड सागरी किनारा तसेच शहराबाहेरील मिऱ्या, जाकीमिऱ्या या गावांच्या सागरी किनाऱ्यावर गेल्या काही वर्षांपासून सागरी आक्रमण सुरू आहे. त्यामुळे या भागातील जमीन सागराने गिळंकृत केली आहे. जनतेच्या सुरक्षिततेसाठी स्थानिकांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर काही टप्प्यांमध्ये या किनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधारा उभारण्यात आला. त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. मात्र, या बंधाऱ्यासाठी मोठा दगड वापरला जावा, तरच हा बंधारा सागरी लाटांच्या तडाख्याला तोंड देईल, अशी अट बंधारा उभारणाऱ्या ठेकेदाराला घालण्यात आली होती. त्याचे पालन झाले नसल्यानेही बंधारा ढासळत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
शनिवारीही उधाणाच्या भरतीच्या तडाख्याने पंधरा माड येथील धूपप्रतिबंधक बंधारा खचून भगदाड पडले व दगड सागराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यानंतर रविवारी दुपारी आलेल्या अमावास्येच्या सागरी उधाणामुळे व महाकाय लाटांमुळे तर या धूप बंधाऱ्याचे कंबरडेच मोडले आहे. अनेक ठिकाणी हा बंधारा खचून कोसळला आहे. त्यामुळे सागरी लाटा बंधाऱ्यावरून नागरी वस्तीत प्रवेश करू लागल्या आहेत.