पानवलचे पाणी आता आठवडाभरच

By admin | Published: February 10, 2016 11:10 PM2016-02-10T23:10:00+5:302016-02-11T00:34:15+5:30

रत्नागिरी नगर पालिका : धरणातील पाण्याने गाठला तळ, प्रयत्न चर्चेतच अडकलेले!

Panval water is now available for a week | पानवलचे पाणी आता आठवडाभरच

पानवलचे पाणी आता आठवडाभरच

Next

रत्नागिरी : रत्नागिरी शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पानवल धरणातील पाणीसाठा येत्या आठवडाभरात संपणार आहे. १९६५ सालापासून कार्यरत असलेल्या या धरणातील पाणी गुरुत्वबलाने रत्नागिरी शहराला मार्च, एप्रिल महिन्यांपर्यत याआधी पुरविले जात होते. दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच पानवल धरणाची पाणी साठवण क्षमता घटली व शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोखंडी व बाहेरून सिमेंट असलेली पानवल धरणापासून ते रत्नागिरी शहरापर्यंतची जलवाहीनी १९६५ पासून कार्यरत झाली. त्याचवेळी हे धरण प्रत्यक्षात सुरू करण्यात आले. या धरणातील पाणी वीज न वापरता गुरुत्वबलाच्या सहाय्याने रत्नागिरीपर्यंत गेल्या ५० वर्षांपासून आणले जात आहे. मात्र, राजकीय उदासिनतेमुळे गाळात रुतलेल्या व गळतीमुळे कमकुवत झालेल्या या धरणाची दुरुस्ती न झाल्याने गेल्या पाच वर्षांपासून फेब्रुवारी महिन्यातच या धरणाचे पाणी आटत आहे.
पानवल धरणातून प्रतिदिवस २ दशलक्ष घनमीटर पाणी रत्नागिरी शहराला पुरविले जाते. या धरणातील गाळही सात वर्षांपूर्वी उपसण्यात आला होता. त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, हा गाळ अन्यत्र न हलवता धरणाच्या काठावरच ठेवण्यात आल्याने पावसाळ्यात पुन्हा धरणात वाहून गेला होता. त्यानंतर या धरणाच्या दुरुस्तीबाबत वा नवीन धरण या जुन्या धरणाच्या शेजारीच बांधण्याबाबत अनेक वेळा चर्चा झाली.
शासनाच्या योजनेतून या धरणाची दुरुस्ती करण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. मात्र, त्यानुसार अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे धरणाच्या दुर्दशेचा फेरा अजूनही कायम आहे.
शहराला दररोज १४ ते १६ दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा केला जातो. यातील सर्वाधिक १२ ते १४ दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा हा शीळ धरणातून केला जातो. मात्र, शीळ धरणातील पाणी ३०० अश्वशक्तीच्या तीन पंपांद्वारे उपसा करून ते जलवाहिनीद्वारे साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्रात आणले जाते. त्यानंतर शहरात वितरित केले जाते. मात्र, शीळचे पाणी शहरात आणण्यासाठी दर महिन्याला नगरपरिषदेला १६ ते २० लाखांचे वीजबिल भरावे लागते. वर्षाला हे वीजबिल दोन कोटींच्यावर येते. नगरपरिषदेवर हा वीजबिलाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
पानवलचे पाणी रत्नागिरी शहरापर्यंत गुरुत्वबलादवारे (ग्रॅव्हिटी) आणले जात असल्याने त्यासाठी विजेचा खर्च येत नाही. त्यामुळे पानवल धरणाची दुरुस्ती करून, उंची वाढवून तसेच धरणातील गाळ उपसा करून या धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा करणे शक्य आहे. परंतु राजकीय उदासिनतेमुळे १९६५ मध्ये उभारलेले पानवलचे धरण अखेरच्या घटका मोजत आहे. (प्रतिनिधी)


सवाल : नवीन प्रस्तावाचे झाले काय?
पानवल धरणाच्या जुन्या बांधकामाशेजारीच पाणी अडविण्यासाठी नवीन धरण बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. जीवन प्राधिकरणकडून हे काम केले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. शासनाकडून निधीचीही व्यवस्था झाल्याचे जाहीर झाले होते. या व्यवस्थेनुसार पानवल धरणाची दुरुस्ती करून जुलैपासून पुढे सहा महिने पानवलचे सर्वाधिक पाणी रत्नागिरीसाठी वापरावयाचे व शीळचे पाणी कमीत कमी वापरायचे. त्यातून वीजबिलात बचत करायची, असे ठरले होते. नंतरच्या मे महिन्यापर्यंतच्या सहा महिन्यात शीळ धरणाचे सर्वाधिक पाणी वापरायचे, असे ठरले होते. परंतु,वर्षभरापूर्वीच्या या प्रस्तावाचे नेमके काय झाले, याचा अद्याप पत्ता नाही. पानवलचे धरण नवीन होणार काय, असा सवाल आता नागरिकांतून होत आहे.

Web Title: Panval water is now available for a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.