कातळावर फुलवले नंदनवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:32 AM2021-04-01T04:32:12+5:302021-04-01T04:32:12+5:30
वेतोशी येथे शेतीला जोड म्हणून कुक्कुटपालन, शेळीपालन व्यवसाय सुरू केले आहेत. कातळावर जमीन असल्याने पाण्यासाठी विहीर आहे. मात्र, उन्हाळ्यात ...
वेतोशी येथे शेतीला जोड म्हणून कुक्कुटपालन, शेळीपालन व्यवसाय सुरू केले आहेत. कातळावर जमीन असल्याने पाण्यासाठी विहीर आहे. मात्र, उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावत असल्याने पाण्याची उपलब्धता होत नाही. शेतीबरोबर जनावरांसाठी पाण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. मात्र, येथील जमिनीत पाणी साठवून ठेवण्याची क्षमता नसल्याने पाण्याचा निचरा होतो. शासनाच्या योजनेचा लाभ घेत, साळुंखे यांनी शेततळे बांधले आहे. यामुळे एक कोटी लीटर पाण्याचा संचय होईल, इतकी क्षमता आहे. सध्या विहिरीचे पाणी तळ्यात साठविण्यात येत आहे. मात्र, येत्या पावसाळ्यात पाणी संचय होऊन, त्याचा वापर शेतीसाठी करता येणार आहे.
शेतीसाठी मजुरांची उपलब्धता हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे यांत्रिक अवजारांचा पर्याय योग्य ठरत आहे. ग्रासकटर, पॉवर टिलर, पॉवर स्प्रेअरचा वापर ते करीत आहेत. सेंद्रीय शेतीकडे त्यांचा कल अधिक असल्याने गांडूळ खत युनिट उभारले आहे. पालापाचोळा संकलित करून गांडूळखत निर्मिती करीत आहेत. १० टन खत ते दरवर्षी तयार करतात.
भातशेतीबरोबर भुईमूग लागवड, तसेच भाजीपाला उत्पादन साळुंखे घेत आहेत. आंबा, काजू, तसेच अन्य पिकांचा दर्जा चांगला असल्याने विक्रीही चांगली होते. शेतीला जोड व्यवसाय म्हणून कुक्कुट व शेळी पालनातूनही त्यांना चांगले अर्थाजन प्राप्त होत आहे. सेवानिवृत्तीनंतर साळुंखे यांनी स्वत:ला शेतीच्या कामात वाहून घेतले आहे. त्यांच्या दोन्ही मुलांनाही शेतीची आवड असल्याने प्रत्येक कामात त्यांची मदत होत आहे.
शेततळ्यामुळे पाण्याची उपलब्धता होणार असल्याने उर्वरित पडीक जमीन लागवडीखाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे फायदेशीर ठरते. पिकांची लागवड, लागवडीच्या पद्धती याबाबत सतत माहिती ते घेत असतात. तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, मंडळ कृषी अधिकारी जयेश काळोखे, कृषी पर्यवेक्षक लक्ष्मीकांत मांडवकर, कृषी सहायक सचिन पवार यांचे मार्गदर्शन लाभत असून, शेततळ्यामुळे साळुंखे यांची पाण्याची समस्या मार्गी लागली आहे.
वेतोशी येथे अशोक साळुंखे यांनी शेतीला बारमाही पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी शेततळे खोदले आहे.
शेतीची आवड पूर्वीपासून असल्याने निवृत्तीनंतर शेतीकडे वळलो. बारमाही शेतीसाठी पाण्याची उपलब्धता गरजेची आहे. विहिरीचे मे महिन्यापर्यंत उपलब्ध होत नसल्याने शेततळ्याचा पर्याय योग्य असल्याची खात्री पटली. त्यानंतर, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांचे मार्गदर्शन घेतले. शासनाच्या अनुदानाचा लाभ घेत शेततळे उभारण्यात असून, यामुळे पाण्याचा प्रश्न मार्गी लागला, शिवाय पडीक क्षेत्र लागवडीखाली येणार आहे.
- रमेश साळुंखे, शेतकरी