..अखेर परशुराम घाट वाहतूकीस खुला, नियम व अटी लागू; गेल्या १० दिवसापासून होता बंद
By संदीप बांद्रे | Published: July 14, 2022 04:00 PM2022-07-14T16:00:21+5:302022-07-14T16:01:53+5:30
हलक्या वाहनांसाठी पर्यायी असलेल्या चिरणी व शेल्डी मार्गावरूनच वाहतूक सुरू राहणार आहे.
संदीप बांद्रे
चिपळूण : गेल्या १० दिवसापासून बंद असलेला धोकादायक परशुराम घाट अखेर वाहतूकीस खुला झाला आहे. मात्र काही नियम व अटी लागू केल्या आहेत. या घाटात सकाळी ६ ते सायंकाळी ७ पर्यंत एकेरी मार्गावर केवळ अवजड वाहतूक सुरू राहणार आहे. तर सायंकाळी ७ ते सकाळी ६ पर्यंत घाट बंद राहणार आहे. घाटातील वाहतूक सुरू करताना विविध उपाययोजना राबविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. हलक्या वाहनांसाठी पर्यायी असलेल्या चिरणी व शेल्डी मार्गावरूनच वाहतूक सुरू राहणार आहे.
परशुराम घाटाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण-रायगड, रत्नागिरी, पोलीस व परिवहन विभाग तसेच उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून अभियाप्राय मागवले होते. परशुराम घाटातील वाहतूक सुरू करण्यासाठी लोटे व खेर्डी येथील कंपन्या, शाळा महाविद्यालयांनीही निवेदन दिली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नियम अटी घालून घाटातील वाहतूक सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार सकाळी ६ ते सायंकाळी ७ पर्यंत अवजड वाहनांच्या एकेरी वाहतुकीबाबतचे नियोजन उपविभागीय दंडाधिकारी खेड व चिपळूण, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड व चिपळूण आणि कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, विभाग पेण-रायगड व रत्नागिरी यांनी संयुक्तपणे करण्याचे आहे. दोन अवजड वाहनांमध्ये किमान 50 ते 100 मीटर इतके अंतर असावे. वाहनांचा वेग ताशी 20 ते 30 किलोमीटर असावा. घाटात दरड प्रवणग्रस्त भागात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तिथे जेसीबी, क्रेन, पोकलेन, अॅम्ब्युलन्स, रस्सी, टॉर्च, अग्नीशामक वाहन आदींची व्यवस्था करावी. जबाबदार अधिकाऱ्यांसह पुरेसे मनुष्यबळ 24 तास मदत व बचाव कार्यासाठी ठेवावे.
रोडच्या बाजुस रिफ्लेक्टर लावावेत. घाटातील वाहतुक कधी सुरू अथवा बंद राहील, याबाबत घाटाच्या सुरुवातीस व घाटाच्या शेवटी तशा आशयाची वाहतुकीची चिन्हे व ठळकपणे दिसणारे फलक लावावेत, अशाही सूचना जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी दिल्या आहेत.