मुंबई- गोवा महामार्गावरील परशुराम घाट प्रवासासाठी बंद, 'या' मार्गे वळवली वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 07:32 PM2022-07-04T19:32:50+5:302022-07-04T19:41:00+5:30
रात्रभर घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून सकाळी पुन्हा पाहणी केल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार
चिपळूण : मुंबई- गोवा महामार्गावरील परशुराम घाट आता सतत धोक्याची घंटा देऊ लागला आहे. शनिवारी (दि.२) रात्री दरड कोसळल्याने घाट काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. आता पुन्हा आज, सोमवारी पावसाचा जोर वाढताच दरडीची माती रस्त्यावर येत असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव सायंकाळी ४.३० वाजल्यापासून घाटातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्ग म्हणून कळंबस्ते चिरणी मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर प्रमुख घाट असलेला चिपळूण येथील परशुराम घाट गेले काही वर्ष धोकादायक ठरू लागला आहे. दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याचे प्रकार सातत्याने घडत राहिले आहे. आता तर चौपदरीकणासाठी येथे मोठ्या प्रमाणात डोंगर कटाई करण्यात आली आहे. त्यामुळे दरडीचा धोका अधिक वाढला असून दरडीची माती दगड रस्त्यावर येण्याचे प्रकार सलग सुरू झाले आहेत.
शनिवारी रात्री घाटातील दरडीची माती व दगड मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने घाटातील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. रस्त्यावरून माती बाजूला केल्यानंतर पहाटे पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली होती. वाहतूक सुरू होऊन २४ तास उलटत नाही तोच आज, सोमवारी पावसाचे धुमशान सुरू असतानाच घाटात दरडीची माती खाली येण्यास सुरुवात झाली होती.
दरडीची माती हळूहळू खाली घसरत असल्याची माहिती मिळताच प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, महामार्ग विभागाचे अधिकारी व ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीनी तात्काळ परशुराम घाटात धाव घेऊन पाहणी केली व सायंकाळी ४.३० वाजलेपासून घाटातील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. अन् या मार्गावरील वाहतूक कलंबस्ते चिरणी मार्गे वळवण्यात आली.
सर्व यंत्रणा सज्ज
रात्रभर घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून सकाळी पुन्हा पाहणी केल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, महामार्ग विभागाचे अधिकारी तसेच ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी घाट परिसरात ठाण मांडून राहिले आहेत. तसेच सर्व यंत्रणा देखील सज्ज ठेवण्यात आली आहे.