परशुराम घाटातील कामाला आचारसंहितेमुळे लागला ‘ब्रेक’; संरक्षक भिंत नव्याने उभारण्याचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 07:12 PM2024-10-23T19:12:28+5:302024-10-23T19:12:50+5:30
संदीप बांद्रे चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंत काेसळल्याच्या घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक एकेरीच सुरू आहे. ...
संदीप बांद्रे
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंत काेसळल्याच्या घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक एकेरीच सुरू आहे. संरक्षक भिंत व काँक्रिटीकरणासाठी मजबुतीकरणाचा प्रस्ताव नव्याने तयार करण्यात आला आहे. लवकरच निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू केले जाणार आहे. मात्र, विधानसभेच्या आचारसंहितेमुळे हे काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तातडीची बाब म्हणून याला मान्यता देण्याची मागणी केली जाणार आहे.
परशुराम घाटात एकीकडे दरड कोसळण्याच्या, तर दुसरीकडे रस्ता खचण्याची भीती असल्याने येथे ठेकेदार कंपनीसह राष्ट्रीय महामार्ग विभागाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. या घाटातील ४० मीटर लांबीची संरक्षक भिंत कोसळल्यानंतर रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. १६ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली असून, त्यावेळेपासून घाटातील एकेरी मार्ग बंद ठेवला आहे.
परशुराम घाटातील दरडीच्या बाजूकडील महामार्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘टीएचडीसीएल’ संस्थेचा सल्ला घेतला जात आहे. तूर्तास संरक्षक भिंत कोसळलेल्या ठिकाणी पुन्हा नव्याने आरसीसी संरक्षक भिंत उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्यात येणार आहे.
गेले आठ-दहा दिवस येथे सातत्याने पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका मुंबई-गोवा महामार्गाला बसला आहे. घटनास्थळी अजूनही धोका टळलेला नाही. संरक्षण भिंतही कोसळलेल्या ठिकाणी भरावाची माती हळूहळू घसरत आहे. त्यामुळे येथे अजूनही बंदोबस्त ठेवून लक्ष ठेवण्यात आले आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने निविदा प्रक्रियेत अडचणी येत आहे.
परशुराम घाटात कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या ठिकाणी नव्याने संरक्षक भिंत उभारून कायमस्वरूपी उपाययोजना केली जाणार आहे. तातडीने त्याचा प्रस्ताव तयार करून निविदा प्रक्रिया तातडीने केली जाणार आहे. त्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार आहे. तसेच तडे गेलेले काँक्रिटीकरण काढून नव्याने काम केले जाणार आहे. -पंकज गोसावी, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण