परळ - दापोली गाडीला म्हाप्रळ येथे अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:36 AM2021-09-06T04:36:01+5:302021-09-06T04:36:01+5:30
मंडणगड : समाेरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने हुलकावणी दिल्याने रस्त्यावरील खड्डे वाचविण्यासाठी अचानक ब्रेक मारल्याने परळ - दापाेली बसला ...
मंडणगड : समाेरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने हुलकावणी दिल्याने रस्त्यावरील खड्डे वाचविण्यासाठी अचानक ब्रेक मारल्याने परळ - दापाेली बसला अपघात झाला. ही घटना ५ सप्टेंबर राेजी पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ (रोहिदासवाडी) येथे घडली. यामध्ये बसचालकासह तीन प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मंडणगड ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन दापोली येथे पाठविण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक हनुमंत फडतरे यांनी दिली.
बसचालक प्रभाकर माधवराव घुगे (३१) यांनी याबाबत मंडणगड पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आपल्या ताब्यातील परळ - दापोली गाडी (एमएच २०, बीएल ३२६९) घेऊन परळ येथून शनिवारी रात्री ११ वाजता निघाले हाेते. यावेळी गाडीत २३ प्रवासी हाेते. म्हाप्रळ दरम्यान गाडी आली असता समोरुन येणाऱ्या चारचाकी वाहनाने हुलकावणी दिली. त्याचवेळी रस्त्यावरील खड्डे वाचविण्यासाठी चालक घुगे यांनी अचानक ब्रेक मारला. त्यामुळे गाडी डाव्या बाजूला रस्त्यालगत कलंडली. या अपघातात चालकासह अन्य तीन प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींवर मंडणगड येथे प्रथमोपचार करुन अधिक उपचारासाठी त्यांना दापोली येथे पाठविण्यात आले.
--------------------------
संताेष गाेवळे यांचे आज आंदाेलन
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदार यांच्या गलथान कारभारामुळे चिंचाळी ते म्हाप्रळ या गावांचे हद्दीत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या समस्येकडे पूर्ण पावसात दुर्लक्ष केलेल्या प्राधिकरणने माती व दगड टाकून खड्डे बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यानंतरही रस्त्यावर दुचाकी, तीनचाकी व लहान चारचाकी वाहनांच्या अपघातांची मालिका सुरूच आहे. रस्त्याच्या या दुरवस्थेबाबत जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे यांनी ६ सप्टेंबर २०२१ रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी प्रांताधिकारी, दापोली व तहसीलदार, मंडणगड यांच्याकडे निवेदन दिले होते. तरीही येथील खड्डे तसेच आहेत. त्यामुळे गोवळे हे आंदाेलनावर ठाम आहेत.