हल्लीच्या मुला-मुलींसह पालकांनाही हुंडा नकोच आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:35 AM2021-09-26T04:35:08+5:302021-09-26T04:35:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : महाराष्ट्रात अथवा अन्य राज्यांमध्ये हुंड्यासाठी छळाच्या तक्रारींची संख्या वाढत असली तरी गेल्या पाच वर्षांत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : महाराष्ट्रात अथवा अन्य राज्यांमध्ये हुंड्यासाठी छळाच्या तक्रारींची संख्या वाढत असली तरी गेल्या पाच वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात केवळ एकच तक्रार दाखल झाली आहे. ही आकडेवारी पाहता रत्नागिरीत हुंडा घेण्याच्या प्रथेलाच तिलांजली देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
हुंडा घेतल्यास किंवा दिल्यास पदवी रद्द करण्याचा निर्णय केरळमधील विद्यापीठाने घेतला आहे. साक्षरतेत देशात पहिल्या स्थानावर असलेल्या केरळ राज्याने घेतलेला हा निर्णय पाहता अजूनही हुंड्यासाठी मुलीला किंवा तिच्या आई-वडिलांना वेठीला धरले जात असल्याची प्रकरणे वाढलेली आहेत. म्हणूनच हुंडाबंदीसाठी स्वतंत्र कायद्याची निर्मिती करावी लागली आहे. नव्या पिढीमध्ये प्रबोधन होण्याच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह म्हणायला हवा.
अन्य जिल्ह्यांमध्ये अथवा राज्यांमध्ये हुंडाबळी किंवा हुंड्यासाठी त्रास दिल्याच्या घटना वाचनात येत असल्या तरी रत्नागिरी जिल्ह्यात खऱ्या अर्थाने याबाबत नव्या पिढीमध्येच नव्हे तर त्यांच्या आई-वडिलांमध्येही प्रबोधन झाल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचा बराचसा भाग ग्रामीण क्षेत्रात येतो; मात्र तरीही सुविद्य झालेल्या नव्या पिढीने आणि त्यांच्या पालकांनी हुंडा नाकारला असून हुंड्याऐवजी मुला-मुलींचे विचार जुळणे आणि एकमेकांना अनुरूप असणे याला अधिक महत्त्व दिले आहे.
हुंडा प्रतिबंधक कायदा काय?
हुंडा प्रतिबंधक कायदा भारतात १९६१ साली पारित करण्यात आला. हुंडा म्हणजे लग्नात एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाला थेट अथवा अप्रत्यक्ष चीजवस्तू, स्थावर-जंगम मालमत्ता देणे अथवा कबूल करणे. हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार केवळ हुंडा मागणे हाच केवळ गुन्हा नाही तर हुंडा देणेही दखलपात्र गुन्हा आहे. त्यासाठी ७ वर्षे ते अगदी आजन्म कारावासही होऊ शकतो.
पैसा महत्त्वाचा आहे का
दोघांची मनं जुळत असतील तर मुलीच्या आई-वडिलांकडे पैसे नाहीत, म्हणून तिला नाकारायचे का?
लग्नानंतरही तिच्या माहेरकडून पैसे आणण्यासाठी तिला सतत त्रास देणे, तिचा छळ करणे, माणुसकीला कलंक लावणारे आहे.
- स्वप्नील साळवी, लग्नाळू तरुण
मुलीला त्रास कशासाठी
मुलगी आपले माहेरचे सर्व सोडून सासरी येते. असे असताना तिला सामावून घेण्याऐवजी तिच्या आई - वडिलांकडे कशासाठी पैसे मागितले जातात. घर व्यवस्थित सांभाळणार म्हणून तिच्या आई -वडिलांना द्यायला हवे.
- प्राची जाधव, लग्नाळू तरुणी
हुंड्यापेक्षा मुलांचा जोडीदार महत्त्वाचा
हल्लीच्या पिढीत रीतसर मागणी घालून पसंतीने लग्न ठरविणे, हा काळ मागे पडू लागला आहे. मुले-मुली एकत्र शिकत असताना किंवा नोकरी - व्यवसायानिमित्त एकत्र येतात. त्यामुळे बहुतांशी मुलं - मुली आपला जोडीदार ठरवितात. विचार जुळल्यावर हुंडा घेण्याचा प्रश्न येतोच कुठे? मन जुळतात, हेच महत्त्वाचे आहे.
- श्रीराम साळवी, मुलाचे वडील
मुला-मुलींची मने जुळणे गरजेचे
हल्लीची पिढी सुविद्य आहे. त्यामुळे आता हुंड्याची प्रथा कालबाह्य ठरू लागली आहे. मुलं-मुली लग्नाच्या बाबतचा निर्णय स्वत:च घेतात. कोकणात हुंड्याची प्रथा आधीही नव्हती, आताही ती नाही. मुलांच्या निर्णयाचा आदर करून त्यांच्या मनांचा सन्मान करायला हवा. हुंडा देऊन किंवा घेऊन त्यांच्या संसारात विष कशाला कालवायचे?
- रमेश जाधव, मुलीचे वडील
हुंड्याची प्रथा कालबाह्य
गेल्या पाच वर्षांत हुंडाबळी किंवा हुंड्यासाठी छळ केल्याची रत्नागिरी जिल्ह्यात एकमेव तक्रार आहे. २०१७ सालापासून भरोसा सेलकडे २०१९ साली एकच तक्रार दाखल झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मुला - मुलींच्या पसंतीचा आदर करून त्यांची लग्ने करून देण्याची मानसिकता वाढली आहे. पैशापेक्षाही मुलांचे संसार सुखाने व्हावेत, ही अपेक्षा पालकांची असल्याने हुंड्याला जागाच नाही.
जिल्ह्यात पूर्वीपासूनच हुंडा घेणारे आणि देणारे यांची संख्या अत्यल्प आहे. शिक्षणाला प्राधान्य दिले जात असल्याने मुलीकडून हुंडा मागणे, ही प्रथा जिल्ह्यात पूर्वीपासूनच नाही.