रत्नागिरीतील जिल्हा परिषदेच्या २४८० शाळांमध्ये फुलली परसबाग; भाज्यांची लागवड करुन पोषण आहारात समावेश
By मेहरून नाकाडे | Updated: September 26, 2024 16:03 IST2024-09-26T16:02:29+5:302024-09-26T16:03:19+5:30
बालवयातच विद्यार्थ्यांना नैसर्गिक शेतीचे ज्ञान

रत्नागिरीतील जिल्हा परिषदेच्या २४८० शाळांमध्ये फुलली परसबाग; भाज्यांची लागवड करुन पोषण आहारात समावेश
मेहरून नाकाडे
रत्नागिरी : विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक वाढावी, पोषण आहारात ताज्या भाज्यांचा समावेश व्हावा, कुपोषण दूर व्हावे, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्याशाळांमध्ये परसबागेची निर्मिती करण्यात येत आहे. शिक्षक, पालक, विद्यार्थी सेंद्रीय भाजीपाला लागवड करीत आहेत. जिल्ह्यात २,४८० शाळांमध्ये परसबाग लागवड करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी अथक परिश्रमातून सुंदर परसबाग निर्मिती करत आहेत. या परसबागेमध्ये मूळा, माठ, मेथी, पालक, मिरची, भेंडी, वालीच्या शेंगा, वांगी, कोथिंबीर, टोमॅटो लागवड करण्यात येत आहे. या भाज्यांचा उपयोग शालेय पोषण आहारात केला जात आहे. त्यामुळे मुलांना दररोज हिरव्या, ताज्या दर्जेदार भाज्या उपलब्ध होत आहेत.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना बालवयात नैसर्गिक शेतीचे धडे मिळत असून, शेतीविषयक आवड निर्माण होत आहे. या उपक्रमामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षकांचे योगदान मिळत आहे. अल्पकालीन पालेभाज्या कमी जागेत, कमी श्रमात लावता येतात, तसेच सूक्ष्म भाजीपाला (मायक्रोग्रीन) लागवड करून त्याचा पोषण आहारात समावेश केला जातो.
बालवयातच विद्यार्थ्यांना नैसर्गिक शेतीचे ज्ञान
जिल्हा परिषद शाळेत परसबाग तयार करून त्यामध्ये भाज्या, फळांची लागवड करून, त्याचा पोषण आहारात समावेश केला जातो. मुलांची शालेय वयापासूनच निसर्गाशी जवळीक निर्माण व्हावी, पोषक आहार मिळावा, कुपोषण दूर व्हावे, या हेतूने परसबाग उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहे. अपुऱ्या जागेमुळे काही शाळा अल्पकालीन भाजीपाला (मायक्रोग्रीन)ची लागवड करून त्याचा आहारात समावेश करीत आहेत.
शाळांमधील उपलब्ध जागा विचारात घेऊन परसबागेची निर्मिती करावी. परसबागांमध्ये स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या भाज्यांची लागवड करण्याच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अनेक शाळांनी परसबागेची निर्मिती केली आहे. शिक्षक, पालक, विद्यार्थी पाैष्टिक, तसेच कमी दिवसात तयार होणाऱ्या विविध भाज्यांसह सूक्ष्म भाज्यांची लागवड करून त्याचा समावेश पोषण आहारात करत आहेत. - बी.एम. कासार, शिक्षणाधिकारी, प्राथमिक.