अर्जुना कालव्याचा भाग गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:22 AM2021-07-16T04:22:23+5:302021-07-16T04:22:23+5:30

पाचल : अवघ्या तीन महिन्यांपूर्वी पाचल - कोंडवाडी येथे अर्जुना कालव्याचे बांधकाम पहिल्याच पावसात वाहून गेले आहे. या कालव्याच्या ...

Part of the Arjuna canal was carried away | अर्जुना कालव्याचा भाग गेला वाहून

अर्जुना कालव्याचा भाग गेला वाहून

Next

पाचल : अवघ्या तीन महिन्यांपूर्वी पाचल - कोंडवाडी येथे अर्जुना कालव्याचे बांधकाम पहिल्याच पावसात वाहून गेले आहे. या कालव्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी केला असून, याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमध्ये पाचल - कोंडवाडी येथील अर्जुना धरणाचा १ किलाेमीटर लांबीचा उजवा कालवा वाहून गेला आहे. कालव्यातील सिमेंट अस्तरीकरण वाहून गेले आहे. पावसाचा जोर आणखी वाढल्यास कालवा फुटून आजुबाजूच्या वस्तीला धोका निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी या कालव्याचे काम करण्यात आले होते. मात्र, पहिल्याच पावसात हा कालवा वाहून गेल्याने बाेगस काम समाेर आले आहे.

तळवडे ब्राह्मणदेव येथील कालव्याची संरक्षक भिंत कोसळली असून, येथील शेतकऱ्यांच्या घरात पाणी घुसले आहे. पहिल्याच पावसात या कालव्याची दुरवस्था व दुर्दशा झाल्याने या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भविष्यात हे काम कसे काय टिकणार? व यावरील फुटब्रीजचे कामदेखील निकृष्ट दर्जाचे झाले आहे. जिल्ह्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प असून, यावर शासनाचे करोडो रुपये खर्च झालेले आहेत. मात्र, या प्रकल्पाच्या कालव्याचे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. त्यामुळे येथील शेतकरी आजही पाण्यापासून वंचित आहेत. आतापर्यंत या प्रकल्पाचा एकाही शेतकऱ्याला उपयोग झालेला नाही. त्यामुळे नेमका हा प्रकल्प कोणासाठी शेतकऱ्यांसाठी की ठेकेदार, अधिकारी यांना पोसण्यासाठी, असा प्रश्नही सौंदळकर यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Part of the Arjuna canal was carried away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.