परूळे येथे सिलिंडरच्या स्फाेटात घर जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:32 AM2021-04-16T04:32:20+5:302021-04-16T04:32:20+5:30
राजापूर : अचानक घराला आग लागल्यानंतर काही वेळातच सिलिंडरचा स्फोट होऊन त्यामध्ये संपूर्ण घर जळाल्याची ...
राजापूर : अचानक घराला आग लागल्यानंतर काही वेळातच सिलिंडरचा स्फोट होऊन त्यामध्ये संपूर्ण घर जळाल्याची घटना तालुक्यातील परुळे वाणीवाडीत बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान घडली. या आगीची पाहणी करण्यासाठी गावचे सरपंच व पोलीस पाटील गेले असतानाच सिलिंडरच्या स्फोट झाला. मात्र, सुदैवाने ते बचावले. दरम्यान, या आगीचे निश्चित कारण समजू शकले नव्हते. शॉर्टसर्किटने ती लागली असावी, असा अंदाज वर्तविला जात होता.
तालुक्यातील परुळे, वाणीवाडी येथे सुदेश रामचंद्र कुरतडकर व भास्कर रामचंद्र कुरतडकर यांचे घर आहे. घरामध्ये पाच जण भाडेकरू आहेत. त्यामध्ये सुदेश कुरतडकर हे आपली आई व अन्य एक महिला असे तिघे जण त्या घरी आहेत. अन्य भाडेकरू मुंबईला गेले आहेत. बुधवारी रात्री साडे आठच्या दरम्यान कुरतडकर यांच्या घराला अचानक आग लागली. त्या वेळी घरातील मंडळी भीतीने घराबाहेर पळाली. दरम्यान, आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण घराला वेढले होते. कुरतडकर यांच्या घरात सुमारे पाच सिलिंडर होते, त्यातील काही रिकामे होते. दरम्यान, लागलेल्या आगीत एका सिलिंडरचा स्फोट झाला आणि आग आणखीनच भडकली.
कुरतडकर यांच्या घराला लागलेल्या आगीची माहिती मिळताच परुळे गावचे सरपंच नितेश सावंत, गावचे पोलीस पाटील सुनील कस्पले व अन्य ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. ते जळीतग्रस्त घराची पाहणी करीत असतानाच अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. मात्र एवढा मोठा स्फोट हाेऊनही सुदैवाने ते दोघे बचावले. या दुर्घटनेची माहिती राजापूर पोलीस स्थानकात देण्यात आली असून, पाेलीस माहिती घेत आहेत.