एप्रिलपासून प्रवाशांना तिकीट दराचा भुर्दंड
By Admin | Published: March 27, 2016 01:04 AM2016-03-27T01:04:04+5:302016-03-27T01:04:04+5:30
पुन्हा भाडेवाढ : तिकिटाच्या किंमतीवर रुपयाचा सेस
रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाने तिकीटाच्या किंमतीवर १ रूपया सेस लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दि. १ एप्रिलपासून प्रवाशांना तिकीटाच्या भाडेवाढीला सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वी दिवाळीमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता एस. टी.ला होणारा तोटा भरुन काढण्यासाठी वीस दिवसांकरिता ही हंगामी भाडेवाढ दि. ५ ते दि. २५ नोव्हेंबरपर्यंत केली होती.
महामंडळातर्फे अपघातग्रस्त मृत प्रवाशांच्या नातेवाईकाला ३ लाख रूपये व जखमी प्रवाशाला ४० हजार रूपयांपासून ७५ हजार रूपयांपर्यंत नुकसानभरपाई दिली जाते. या रकमेत वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार मृत प्रवाशांच्या वारसांना दहा लाख रूपये देण्यात येणार आहेत.
तसेच जखमींना देण्यात येणाऱ्या मदत निधीतही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, संबंधित वाढीव निधी देण्यासाठी तिकीटदरावर एक रूपयांची वाढ करण्यात येणार आहे. संबंधित भाडेवाढीची अंमलबजावणी दि. १ एप्रिलपासून लागू होणार आहे.
यापूर्वी महामंडळाने दि. २२ आॅगस्ट २०१४ रोजी भाडेवाढ केली होती. त्यानंतर दि. ५ ते दि. २५ नोव्हेंबरपर्यंत लवचिक भाडेवाढ करण्यात आली होती. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या प्रवाशांना या तिकीटवाढीचा दणका बसणार आहे. रत्नागिरी विभागाचे महिन्याचे उत्पन्न ३० कोटी इतके आहे. भाडेवाढीमुळे या उत्पन्नात १ कोटीची वाढ होणार आहे.
रत्नागिरी - आरेवारेमार्गे - गणपतीपुळे पूर्वीचा तिकीट दर ३२ रुपये असून, आता तो ३३ रूपये होणार असून, रत्नागिरी - कोतवडेमार्गे गणपतीपुळे तिकीट दर ४४ रूपये असून, तो आता ४५ रूपये होणार आहे. रत्नागिरी चाफेमार्गे गणपतीपुळे तिकीट दर ५० रूपये असून, तो आता ५१ रूपये होणार आहे.
महामंडळातर्फे दि. २२ आॅगस्ट २०१४ रोजी नियमीत भाडेवाढ करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर इंधनाचे दरातील चढउतार विचारात घेता महामंडळाने तिकिट दर स्थिर ठेवले होते. मात्र, दिवाळीच्या सुटीत सहलीसाठी व पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेतातोटा भरुन काढण्यासाठी हंगामी भाडेवाढ जाहीर करण्यात आली
आहे.
ही भाडेवाढ केवळ गर्दीच्या हंगामासाठी लागू राहणार असल्याचे एस. टी.च्या सूत्रांनी सांगितले. प्रत्येक तिकीटामागे एक रूपयांची वाढ प्रवाशांना सोसावी लागणार आहे. सध्या रत्नागिरी विभागातील काही महत्वाच्या मार्गावर सुरू असणाऱ्या गाड्यांचे सध्याचे तिकीट दर व एक रूपयांप्रमाणे वाढ केल्यास प्रत्येक तिकीट दर एक रुपयाने वाढणार आहे. (प्रतिनिधी)