रत्नागिरी आगाराकडून प्रवाशांची कुचेष्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:22 PM2017-07-24T18:22:41+5:302017-07-24T18:22:41+5:30

एस्. टी. गाड्यांवर खडूचे फलक

Passengers of travelers from Ratnagiri Agra | रत्नागिरी आगाराकडून प्रवाशांची कुचेष्टा

रत्नागिरी आगाराकडून प्रवाशांची कुचेष्टा

Next

 आॅनलाईन लोकमत/अरुण आडिवरेकर

रत्नागिरी, दि. २४ : ^^‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ अशी बिरूदावली मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने प्रवाशांचीच कुचेष्टा मांडली आहे. रत्नागिरी शहरातून फिरणाऱ्या गाड्यांवर सध्या खडूने लिहिलेले फलक पाहायला मिळत आहेत. हे फलक दूरवरून प्रवाशांना दिसत नसल्याने गाडी चुकण्याचे प्रकारही घडत आहेत.

रत्नागिरी विभागाच्या या कारभारानंतर आता राज्य परिवहन महामंडळाच्या भरतीत ‘सुवाच्च अक्षर असणे आवश्यक’ अशी अट आल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. सर्वसामान्यांची ‘जीवनवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळातर्फे एस्. टी.कडे प्रवासी वळण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजना राबवताना प्रवाशांच्या सोयीसाठी कोणत्याही उपाययोजना करताना महामंडळ दिसत नाही.

नवनवीन योजना राबवताना प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा देण्याबाबत उदासिनता दिसून येत आहे. त्यामुळे या कारभाराबाबतच साशंकता निर्माण झाली आहे. रत्नागिरी शहरातून फिरणाऱ्या शहरी वाहतुकीच्या गाड्यांवर लावण्यात येणाऱ्या फलकांची वानवा असल्याचे यातून दिसत आहे. या फलकांऐवजी गाड्यांवरील काचेवर खडूने फलक लिहिले जात आहेत. खडूने लिहिलेले हे फलक नीट दिसतही नसल्याने प्रवाशांची अडचण होत आहे. गाडीसाठी बसथांब्यावर उभ्या असणाऱ्या प्रवाशांना हे फलक दिसत नसल्याने गाडी पुढ्यातून निघून गेल्यानंतरही गाडी कोणती आहे, हेच लक्षात येत नाही.

शहरातील बहुतांशी भागात जाणाऱ्या गाड्यांवर खडूने लिहिले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या गाड्यांचे फलक लिहिण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडे निधीची कमतरता आहे का? असाच सवाल केला जात आहे. ऐन पावसाळ्यातच गाडीवर खडूने लिहिले जात असल्याने पाऊस पडल्यानंतर हा फलक पाण्यामुळे गायब होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातही गाडी चुकल्यानंतर प्रवाशांना पुन्हा पुढच्या गाडीसाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. एस्. टी.च्या शहरी वाहतूक गाड्यांवर लिहिण्यात येणारे हे खडूचे फलक पाहिल्यानंतर आता नव्याने होणाऱ्या भरतीमध्ये चालक व वाहक पदांसाठी ‘सुवाच्च अक्षर असणे आवश्यक’, अशी अट महामंडळाने घातल्यास त्याबाबत आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

Web Title: Passengers of travelers from Ratnagiri Agra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.