संगणकामुळे कळली प्रवासी संख्या

By admin | Published: August 9, 2016 11:29 PM2016-08-09T23:29:49+5:302016-08-09T23:50:51+5:30

प्रकाश रसाळ : अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून संवेदनशील प्रतिसाद

Passengers traveling through computer | संगणकामुळे कळली प्रवासी संख्या

संगणकामुळे कळली प्रवासी संख्या

Next

मुंबई - गोवा महामार्गावरील पोलादपूर- महाड दरम्यानचा सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल तुटला. या दुर्घटनेत जयगड - मुंबई व राजापूर - बोरिवली या दोन्ही गाड्यांना जलसमाधी मिळाली. दोन्ही गाड्यांतील २७ प्रवासी व चालक वाहक मिळून ३१ जण बेपत्ता झाले. गाडीत एकूण किती प्रवासी होते, याची माहिती जीपीएस यंत्रामुळे मिळू शकली, असे सांगतानाच प्रभारी वाहतूक नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी या यंत्रणेबाबतची माहिती ‘लोकमत’ला दिली.


प्रश्न : सावित्री नदीवरील पूल तुटल्यामुळे झालेल्या दुर्घटनेतील प्रवासी संख्या कशी मिळाली ?
उत्तर : मुंबई - गोवा महामार्गावरील पोलादपूर - महाड दरम्यानचा पूल तुटला. या दुर्घटनेत जयगड - मुंबई व राजापूर - बोरिवली या एस. टी. बसेस बेपत्ता झाल्यामुळे सुरूवातीला चालक वाहकांसह २२ प्रवासी असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. राजापूर - बोरिवली व जयगड - मुंबई गाड्यांच्या चालक - वाहकांची ड्युटी चिपळुणात संपल्यानंतर दुर्घटनेत सापडलेल्या चालक - वाहकांनी बसचा ताबा घेतला होता. ड्युटी संपल्यामुळे पूर्वीच्या चालकांनी हिशेब चिपळूण आगारात सादर केला होता. ईटीएम मशीनमुळे चिपळूणपर्यंतची सर्व माहिती चिपळूण आगारात प्राप्त झाली होती. मात्र, चिपळूणपासून राजापूर - बोरिवली गाडीचे वाहक टी. बी. शिर्के, चालक जी. एस. मुंडे यांनी, तर जयगड - मुंबई गाडीचे वाहक व्ही. के. देसाई, चालक एस. एस. कांबळे यांनी बसचा ताबा घेतला होता. परंतु दोन्ही गाड्यांना जलसमाधी मिळाल्यामुळे काहीच माहिती उपलब्ध होत नव्हती. परंतु जीपीएस यंत्रणेमुळे मुंबई सेंट्रल येथील संगणकप्रणालीव्दारे माहिती मिळवण्यात आली. त्यातून चालक - वाहकांसह एकूण ३१ प्रवासी असल्याची माहिती मिळाली. ड्युटी संपलेल्या चालक - वाहकांचे महाड येथे जबाब नोंदवण्यात आले. राजापूर गाडीत १७ आणि जयगड गाडीतील १० प्रवाशांसह दोन्ही गाड्यांचे चालक - वाहक मिळून एकूण ३१ जण होते.
प्रश्न : रत्नागिरी जिल्ह्यात ब्रिटिशकालीन ११ पूल असून, त्याची आयुर्मर्यादा संपली आहे, सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर किती मार्गावरील वाहतूक बंद केली आहे अथवा काय सूचना दिली आहे का?
उत्तर : वाहतूक बंद किंवा चालू ठेवण्याबाबत एस. टी.ला सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र आवश्यक असते. परंतु जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन ११ पुलांची आयुर्मर्यादा संपली असली तरी संबंधित मार्गावरील वाहतूक बंद करण्याबाबत कोणतेही शासकीय आदेश अद्याप एस. टी. प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे सध्या तरी या मार्गावरील वाहतूक सुरू आहे.
प्रश्न : दुर्घटनेवेळी एस. टी.च्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी नेमकी काय भूमिका बजावली?
उत्तर : सावित्री नदीवरील दुर्घटनेमुळे एस. टी.चा सर्व कर्मचारीवर्ग हळहळला. प्रत्यक्ष ठिकाणी कर्मचारी, अधिकारी होतेच, परंतु प्रत्येक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी नेटाने पूर्ण केली. माझ्याबरोबर विभागीय सहाय्यक वाहतूक अधिकारी, सुरक्षा व दक्षता अधिकारी, प्रशिक्षणार्थी चालकांचे संपूर्ण पथक, तपासणी पथक, खेड व चिपळूण आगार व्यवस्थापक व त्यांचे सहकारी दुर्घटनास्थळी होते. राजापूर ते आंबेत सागरी मार्गावर तपासणीसाठी कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत होते. अजून आंबेत येथे एक पथक आहे. शिवाय राजापूर, चिपळूण, रत्नागिरी येथे नियंत्रण कक्ष असून, नातेवाईकांना माहिती देण्यात येत आहे. मृत २० प्रवाशांच्या नातेवाईकांना १० हजारांची तत्काळ मदत देऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यात आले आहेत.
प्रश्न : गाडीत प्रवासी बसल्यानंतर तिकीट रकमेतून प्रवासी विम्याचा एक रूपया घेण्यात येत होता. विम्याची रक्कम प्रवाशांना मिळणार आहे का?
उत्तर : प्रवासी गाडीत बसल्यानंतर इच्छितस्थळी उतरेपर्यंत अर्थात् त्या प्रवासापर्यंत विमा असतोे. मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना एकूण किती रक्कम द्यावयाची, याबाबत अद्याप कोणताही लेखी आदेश प्राप्त झालेला नाही. आदेश प्राप्त झाल्यावर त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जाणार आहे.
प्रश्न : एस. टी.चे एकूण किती नुकसान झाले आहे ?
उत्तर : एस. टी.तील अजून नऊ प्रवासी व बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेणे सुरू आहे. फलक व बंपरव्यतिरिक्त काहीच सापडलेले नाही, त्यामुळे एकूण किती नुकसान झाले, हे अजून निश्चित करण्यात आलेले नाही.
- मेहरून नाकाडे


अद्याप नऊजण बेपत्ता
राजापूर - बोरिवली व जयगड - मुंबई गाड्यांमधे प्रवासी, चालक व वाहक मिळून एकूण ३१ जण होते. जयगड-मुंबईमध्ये १२ व राजापूर - बोरिवली गाडीत १९ जण होते. पैकी आतापर्यंत २२ मृतदेह सापडले असले तरी नऊजण बेपत्ता आहेत. दुर्घटनेला आठवडा झाला तरी एकाही गाडीचा शोध लागलेला नाही.
तत्पर कामगिरी
महाड येथील दुर्घटनेवेळी सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांनी चांगली कामगिरी बजावली. आंबेत येथे अजूनही एस. टी.चे शोधपथक कार्यरत आहे. एस. टी.चे तपासणी पथक, प्रशिक्षणार्थींचे पथक महाडमध्ये आहे. बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाईकांना माहिती देणे, तत्काळ मदत देणे, मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनानंतर घरी पोहोचवणे, ही कामे जबाबदारीने सुरू आहेत.

Web Title: Passengers traveling through computer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.