पासपोर्टसाठी माराव्या लागतात मुंबईत फेऱ्या
By admin | Published: November 2, 2014 12:48 AM2014-11-02T00:48:01+5:302014-11-02T00:48:01+5:30
खासगी कंपनीकडे सुपूर्द
रत्नागिरी : पासपोर्ट कार्यालय खासगी कंपनीकडे सुपूर्द करण्यात आल्याने रत्नागिरी जिल्हा मुख्यालयात असलेले पासपोर्ट कार्यालय मुंबईत हलविण्यात आले आहे. परिणामी जिल्हावासियांना पासपोर्ट काढण्यासाठी मुंबईत फेऱ्या माराव्या लागत आहे. त्याकरिता हजारो रुपये खर्च येत असून खासगी एजंटदेखील पासपोर्ट काढण्यासाठी पैसे उकळत असल्याचे निदर्शनास येत आहे.
अनेकजण परदेशात शिक्षण व नोकरीसाठी जातात. याशिवाय नातेवाईकांकडे किंवा पर्यटनासाठी जाणारी मंडळी असल्याने पासपोर्ट काढण्यासाठी त्यांना मुंबईमध्ये जावे लागते. दरमहा हजारोंचे अर्ज पासपोर्टसाठी आहेत. परंतु जिल्ह्यात ही प्रक्रिया होत नाही. जिल्हावासियांना आॅनलाईन नोंदणी करावी लागते. मुंबईत एजन्सीच्या कार्यालयात कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ घेऊनच मुंबईवारी करावी लागत आहे. मुळ पासपोर्टसाठी दिड हजार रुपये खर्च येतो. परंतु जाण्यायेण्यासाठी दोन हजारापर्यंतचा खर्च सोसावा लागत आहे. शिवाय लागणारा अर्ज व त्याकरिता जोडली जाणारी संंबंधित कागदपत्रे याबाबत माहिती नसल्याने त्यासाठी एजंट किंवा दलालांचा आधार घ्यावा लागतो. अर्ज भरुन देण्यासाठी दलाल दोन हजार रुपये घेत आहेत. त्यामुळे पासपोर्ट काढण्याकरिता पाच हजारापेक्षा अधिक खर्च लोकांना येत आहे. संबंधित कागदपत्रांची छाननी होऊन कागदपत्रे मुंबईहून रत्नागिरी पोलीस मुख्यालयात पाठविली जातात. त्यानंतर संंबंधित व्यक्तीची चारित्र्य पडताळणी पोलीस ठाण्यामध्ये होते. संबंधित पोलीस ठाण्यातील निरीक्षकांचे हमीपत्र मुंबईला पाठविले जाते. त्यानंतर टपालाने पासपोर्ट घरी पाठविला जातो. एकूणच किचकट स्वरुपाची प्रक्रिया असलेल्या पासपोर्टचे कार्यालय रत्नागिरी जिल्ह्यातच सुरु करावे अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)