ऐन पावसाळ्यात उक्ताड बायपास रस्त्यावर पॅचवर्कचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:39 AM2021-06-09T04:39:27+5:302021-06-09T04:39:27+5:30
चिपळूण : अख्खा उन्हाळा वाया गेला आणि आता गुहागर बायपास मार्गावरील खड्डे संबंधित ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या अधिकाऱ्यांना ...
चिपळूण : अख्खा उन्हाळा वाया गेला आणि आता गुहागर बायपास मार्गावरील खड्डे संबंधित ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या अधिकाऱ्यांना दिसले. खड्डे बुजवा, खड्डे बुजवा अशी ओरड होऊनही या मार्गावरचे खड्डे काही बुजले नाहीत. आश्चर्य म्हणजे संबंधितांनी ऐन पावसाळ्यात आणि ते सुद्धा घाईगडबडीत आपल्या कामाची चुणूक दाखवून या रस्त्यावर डांबराने पॅचवर्कचे काम हाती घेतले घेतले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग व गुहागर-विजापूर राष्ट्रीय मार्ग या दोन प्रमुख मार्गांना गुहागर बायपास मार्ग जोडतो. सुमारे ३ किलोमीटरच्या या मार्गावर गेली काही वर्षे कायमस्वरूपी डागडुजी न झाल्याने हा मार्ग ठिकठिकाणी खड्डेमय झाला आहे. बऱ्याच ठिकाणी डांबराचा थरही उडाला आहे. वाहतुकीसाठी धोकादायक बनलेले खड्डे बुजविण्यात यावेत, यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांसह राजकीय पुढाऱ्यांनी अनेक वेळा आवाज उठविला. त्याची दखल घेत केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम संबंधित विभागाने केले. गेली दोन वर्षे हा मार्ग नव्याने करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे. त्यासाठी मुराद अडरेकर पाठपुरावा करीत आहेत.
त्यांनी या मार्गावरचे खड्डे भरण्यासाठी उपोषण व आत्मदहनाचा इशाराही दिला होता. अतिवृष्टीच्या काळात महामार्गावरचा वाशिष्ठी पूल वाहतुकीसाठी बंद करून वाहतूक गुहागर बायपासमार्गे वळविली जात आहे. वाशिष्ठी नवीन पुलावरील एकेरी वाहतूक यावर्षीच्या पावसाळ्यात सुरू होईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे पावसाळ्यात गुहागर बायपास रस्त्यावरची वाहतूक वाढणार आहे. अशातच ऐन पावसाळ्यात खड्डे भरण्याचे काम हाती घेण्यात आल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
---------------------
गैरसाेय हाेऊ नये म्हणून काम
गुहागर बायपास मार्ग अद्याप राष्ट्रीय महामार्ग उपविभागाकडे वर्ग झालेला नाही. त्यामुळे त्यावर खर्च टाकून काम करणे शक्य नव्हते. मात्र, पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी विनंती करून संबंधित ठेकेदार कंपनीकडून डांबराने खड्डे भरण्याचे काम करून घेतले.
- आर. आर. मराठे, उपविभागीय अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, चिपळूण.
---------------------
चिपळूण-गुहागर बायपास रस्त्यावर ऐन पावसाळ्यात पॅचवर्कचे काम सुरू आहे.