एकजुटीतून शोधला उत्पन्नाचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:29 AM2021-03-25T04:29:01+5:302021-03-25T04:29:01+5:30

रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे गावात राहणाऱ्या काही महिला घरची शेती करीत असतानाच मजुरी करून संसाराला हातभार लावत असत. नियमित ...

The path to income discovered through solidarity | एकजुटीतून शोधला उत्पन्नाचा मार्ग

एकजुटीतून शोधला उत्पन्नाचा मार्ग

Next

रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे गावात राहणाऱ्या काही महिला घरची शेती करीत असतानाच मजुरी करून संसाराला हातभार लावत असत. नियमित कामकाज करीत असतानाच बचत गट स्थापन करून नवीन उत्पन्नाचा मार्ग शोधत असतानाच त्यांना ‘उमेद’ (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) यांच्या जिल्हा व्यवस्थापन कक्षाचे मार्गदर्शन लाभले. सर्व महिलांनी एकत्रित येऊन काजू प्रक्रिया युनिट स्थापन केले आहे.

मावळंगे गावातील बहुतुलेवाडीत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बचत गटाची स्थापना करण्यात आली. महिलांनी एकत्रित येऊन नवीन व्यवसाय करून स्वत:साठी रोजगार निर्माण करण्याबाबत विचारविनिमय सुरू केला. ‘उमेद’च्या मार्गदर्शनाने समान व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी एनआरईटीपी प्रकल्पांतर्गत उत्पादक गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू होती. वाडीतील महिलांची चर्चा करून काजू प्रक्रिया उद्योग सुरू करण्याबाबत एकमत झाले व तीन वर्षांपूर्वी झेप उत्पादक गटाची निर्मिती करण्यात आली.

कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य प्रशिक्षणाबरोबर भांडवलाची आवश्यकता भासते. त्याप्रमाणे काजू प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी भांडवल, कच्चा माल, प्रक्रिया करण्यासाठी यंत्रे, उद्योग उभारण्यासाठी जागेशिवाय मशीन हाताळणे व उत्पादनाचा दर्जा राखण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. शिवाय ग्रामीण भागात दळणवळणाच्या सोयी कमी असल्याने महिलांसमोर यक्षप्रश्न उभा राहिला. मात्र न डगमगता सर्व हिरकणींनी एकजूट दाखवत, झोकून देत काम करण्याचा निश्चय केला.

झेप उत्पादक गटाने लागणारा कच्चा माल गोळा कसा करता येईल त्याकरिता संग्राम प्रभाग संघाच्या व्यवस्थापक रिया पवार यांची बैठक घेऊन माहिती घेतली. भांडवलासाठी ग्रामसंघाकडून बचत गटाने कर्ज घ्यायचे ठरले. शिवाय काजू बी ग्रामसंघाकडून खरेदी करायचे निश्चित करण्यात आले. जेणेकरून काजू खरेदीमुळे इतर महिलांनाही त्याचा फायदा होईल. त्यानुसारे एक लाख ८० हजार रुपयांची काजू बी खरेदी करण्यात आली. शिवाय ती उन्हात वाळविण्यात आली.

काजूवर प्रक्रिया करून गर अलगीकरणासाठी प्रशिक्षण गरजेचे असल्याने राजापूर येथे गटाच्या सर्व महिलांनी भेट देऊन काजू प्रक्रिया उद्योगाबाबत माहिती घेतली. एक दिवस थांबून पूर्ण प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षित असलेल्या शीला कदम यांना गटात सहभागी करून घेतले. प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक यंत्र तातडीने खरेदी करण्याऐवजी सुरुवातीला भाडेतत्त्वाने कुठे यंत्र मिळते का, ते पाहण्यास सुरवात केली गेली. परंतु त्याच दरम्यान एनआरईटीपी प्रकल्पांतर्गत उत्पादक गटाला दोन लाखांचे कर्ज प्राप्त झाले. त्यामुळे भाड्याने यंत्र घेण्याऐवजी महिलांनी ते स्वत:च खरेदी करण्याचे निश्चित केले. आता आवश्यकता होती ती जागा व वीजजोडणीची. मात्र संघ सचिव वृषाली कदम यांच्या सहकार्याने तोही प्रश्न निकाली निघाला.

कामकाजाची जुळणी झाल्यानंतर महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. आनंदाने ‘युनिट’चे उद्घाटन करण्यात आले. ग्रामस्थांनीही महिलांच्या कार्याचे कौतुक केले. विविध शासकीय अधिकाऱ्यांनी भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनीही भेट देऊन झेप उत्पादक गटाचे कौतुक केले.

काजूगर प्रक्रिया सुरू असतानाच बाजारात माल विक्रीसाठी पाठविताना आकर्षक पॅकिंग तसेच लेबल लावणे गरजेचे आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व्यवस्थापन कक्ष रत्नागिरी जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर व जिल्हा व्यवस्थापक विपणन अतुल चाटे यांच्या मदतीने लेबलिंग व पॅकिंगचे प्रशिक्षण देण्यात आले; शिवाय उत्पादक गटाचे फूड लायसेन्स, उद्योग आधार व इतर कागदपत्रांसाठी मार्गदर्शन केले.

माल तयार झाल्यानंतर माल विकण्याचा मार्ग शोधतानाच ‘उमेद’अंतर्गत विविध व्यापारी यांचे पत्ते व मोबाईल क्रमांक मिळविण्यात आले. त्यानंतर प्रक्रिया केलेले काजूगर मुंबई, पुणे, गुजरात येथे विक्रीसाठी पाठविण्यात आले. मोठ्या शहराबरोबर परराज्यांतून मागणी वाढू लागली. त्यानंतर स्थानिक बाजारपेठेतही विक्री सोपी झाली. मावळंगेतील १५ महिलांनी एकत्रित येऊन काजू प्रक्रिया व्यवसाय सुरू केला असून, अन्य बचतगटांतील महिलांसाठी तो प्रेरणादायी आहे.

Web Title: The path to income discovered through solidarity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.