‘फार्मास्युटिकल्स’चा मार्ग सुकर

By admin | Published: February 25, 2015 10:18 PM2015-02-25T22:18:25+5:302015-02-26T00:12:47+5:30

लोटे वसाहत : विकासाकरिता संपादित जमिनीच्या भरपाईचे वितरण

The path of 'pharmaceuticals' will be facilitated | ‘फार्मास्युटिकल्स’चा मार्ग सुकर

‘फार्मास्युटिकल्स’चा मार्ग सुकर

Next

श्रीकांत चाळके -खेड  तालुक्यातील सुप्रसिध्द अशा लोटे औद्यौगिक क्षेत्राच्या विकासाकरिता सुमारे २५ वर्षांपूर्वी संपादीत केलेल्या ६९० हेक्टर जमिनीवरील बांधकामाच्या नुकसानभरपाईपोटी ४० लाख रुपये संबंधित जमीन मालकांना नुकतेच वितरण करण्यात आले. लोटे औद्यौगिक वसाहतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किसन जावळे यांच्याहस्ते हे वाटप करण्यात आले़ यामुळे फार्मास्युटिकल्स झोन म्हणून जाहीर झालेल्या या प्रकल्पाच्या जमीन सर्व्हेचा मार्ग सुकर झाला
आहे. लवकरच या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यामुळे ही वसाहत वरदान ठरेल की शाप, ही इथल्या स्थानिकांच्या दृष्टीने चिंतनीय बाब असल्याचे बोलले जात आहे़लोटे औद्यौगिक क्षेत्र विकसित करण्याकरिता २५ वर्षांपूर्वी लोटेनजीक असलेल्या असगणी, दाभीळ, असगणी मोहल्ला, सात्वीणगाव आणि लवेल येथील १०६ शेतकऱ्यांची ६९० हेक्टर जमीन संपादीत करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. या जमिनीचा मोबदला वितरीत करण्याचे काम १९९७मध्ये सुरू करण्यात आले. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यावेळी तेथील जमीनदारांना त्यांच्या जमिनीतील गडगे, गोठे आणि फळझाडांची नुकसानभरपाई देण्यात आली नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. ही बाब उपविभागीय अधिकारी आणि विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आली होती.याकामी स्थानिक संघर्ष समिती आणि उच्चाधिकारी समितीने केलेल्या पाठपुराव्याला चांगलेच यश मिळाले आहे. त्याचा परिणाम म्हणून १९९९मध्ये खेडचे तालुका भूमी निरीक्षक आणि एमआयडीसीच्या उपअभियंत्यांनी पाहणी केली होती़ याचे एमआयडीसीने मूल्यांकनही केले होते़ आणि दापोली येथील विशेष भूसंपादन अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला़ याकरिता संघर्ष समितीने पाठपुरावाही केला़ त्यामुळे उच्चाधिकार समितीने त्या प्रस्तावाला मान्यता दिली. तरीही येथील जमीनमालकांना त्यांच्या हक्काचा जमिनीचा मोबदलाही देण्यात आला नव्हता.यानंतरही स्थानिक पातळीवरील विविध समित्यांनी पाठपुरावा केल्यानंतर गतवर्षी जून महिन्यात जावळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विशेष सभेत जमीनदारांना मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते़ त्याप्रमाणे तेथील १० जमीनदारांना १ मे २०१४दरम्यान धनादेशांचे वितरणही करण्यात आले होते.उर्वरितांना त्यानंतर धनादेशाचे वितरण करण्यात आले असून, यामुळे फार्मास्युटिकल्स झोनचा मार्ग आता सुकर झाला आहे. दरम्यान, फार्मास्युटिकल्स झोन म्हणून जाहीर केलेल्या या लोटे औद्यौगिक वसाहतीची यानिमित्ताने प्रगती होईल की अधोगती होईल, याबाबत मात्र अद्याप स्थानिकांनाही शंका वाटत आहे.

स्थानिकांची भूमिका
औद्योगिक वसाहतीच्या विकासाकरिता जी जमीन संपादित करण्यात आली, त्या जमिनीबाबतची भरपाई देण्यात आली असली तरी हा विकास खरोखरच स्थानिकांना लाभदायी ठरणार का? की यामुळे परिसराची अधोगती करणार? याबाबत शंका व्यक्त होत आहे. स्थानिकांना विश्वासात घेऊनच हा विकास झाला पाहिजे, अशी भूमिका आता स्थानिकांमध्ये तयार होऊ लागली आहे.


लवकरच प्रारंभ
लोटे औद्यौगिक वसाहतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किसन जावळे यांच्याहस्ते धनादेशाचे वाटप.
फार्मास्युटिकल्स झोनच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार.
लोटे औद्यौगिक क्षेत्र विकसाकरिता २५ वर्षांपूर्वी असगणी, दाभीळ, असगणी मोहल्ला, सात्वीणगाव आणि लवेल येथील १०६ शेतकऱ्यांची ६९० हेक्टर जमीन संपादीत.
१९९७पासून जमिनीचा मोबदला वितरणाचे काम.

Web Title: The path of 'pharmaceuticals' will be facilitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.