रत्नागिरी रुग्णालयातून रुग्ण बरा होऊन जाताे, हा आनंद देणारा क्षण - डाॅ. भास्कर जगताप
By शोभना कांबळे | Published: February 7, 2024 06:20 PM2024-02-07T18:20:02+5:302024-02-07T18:20:29+5:30
पहिल्याच दिवशी त्यांनी सर्व कर्मचारी यांची बैठक घेतली.
रत्नागिरी : रुग्णालयातून रुग्ण बरा होऊन जातो हे आपल्याला समाधान आणि आनंद देणारा क्षण असतो. हा आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे, अशा भावना रत्नागिरीचे नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. भास्कर जगताप यांनी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केल्या.आधीच्या जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले- गावडे यांची येथील प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या अधिक्षकपदावर बदली झाली असून त्यांच्या जागी डाॅ. भास्कर जगताप यांची बदली झाली आहे. मंगळवारी त्यांनी आपला पदभार स्वीकारला.
पहिल्याच दिवशी त्यांनी सर्व कर्मचारी यांची बैठक घेतली. त्यानंतर कार्यालय कर्मचारी, परिचारिका यांची ओळख करुन घेतली. सर्व कर्मचाऱ्यांनी डॉ. जगताप यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी डाॅ. भास्कर जगताप म्हणाले की, रूग्णालयात येणारा रुग्ण हा गरिब घरातून आलेला असतो. त्याच्या खिशात पैसे नसतात. जिल्हास्तरावरील रुग्णालयात आल्यामुळे तो घाबरलेला असतो. अशा वेळी त्या रुग्णाला आपण धीर देत उपचार केले पाहिजे. त्याला बरे करुन सुखरुप घरी पाठविणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपण रुग्णांसाठी आहोत याचे भान प्रत्येक कर्मचाऱ्याने ठेवले पाहिजे. आपल्याला रुग्ण वाचवायचा असतो, जबाबदारी झटकून चालणार नाही, अशी सक्त सुचनाही त्यांनी दिली. परिचारिकांची संख्या अपूरी आहे. याची माहिती मी घेतली आहे. त्यासाठी मी पाठपुरावा करुन कर्मचारी संख्या कशी परिपूर्ण होईल यासाठी प्रयत्न करेन. तोपर्यत आहे त्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगी जास्त वेळ काम करुन रुग्णसेवा द्यावी. त्यामध्ये खंड पडणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे, अशी सुचनाही डॉ. जगताप यांनी यावेळी केली.