रुग्णांची लूट थांबणार कधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:41 AM2021-06-16T04:41:10+5:302021-06-16T04:41:10+5:30

आपल्याकडे कोणीही येतो आणि टिचकी मारुन जातो, असा प्रकार सुरु आहे. लूट ही अनेक माध्यमातून सुरु आहे. त्यामध्ये ...

The patient robbery will never stop | रुग्णांची लूट थांबणार कधी

रुग्णांची लूट थांबणार कधी

googlenewsNext

आपल्याकडे कोणीही येतो आणि टिचकी मारुन जातो, असा प्रकार सुरु आहे. लूट ही अनेक माध्यमातून सुरु आहे. त्यामध्ये शासकीय कामांमध्येही निकृष्ठ दर्जाचे काम करुन लूट करत आहेत. शासनाकडून करण्यात येणारी विकासकामे ही जनतेच्या पैशातूनच केली जातात. त्यामुळे लूट, भ्रष्टाचाराची कीड सर्वच ठिकाणी लागलेली आहे. आम्ही सर्वकाही निमूटपणे सहन करत आहोत. आपल्याला सवयच झाली आहे. कोणीही काहीही केले तरी त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आज समोरच्यावर अन्याय होतो, उद्या आपल्यावरही होईल, याचा आपण विचारच करत नाही. त्यामुळे तोंडात कागदाचा बोळा घालून मुक्क्याने मारले तरी सहन करण्यापलिकडे आपण काहीही करत नाही. त्यामुळे जनावरांची जशी स्थिती आहे, तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कितीही लूट, भ्रष्टाचार झाला तरी आपण आपले डोळे मिटून, मूग गिळून बसण्यापलिकडे काहीही करत नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव पहिल्या लाटेत जास्त करुन शहरी भागातच होता. मात्र, दुसऱ्या लाटेत कोरोनाने हातपाय पसरुन तो ग्रामीण भागापर्यंत पोहोचला. त्यामुळे वाडी-वस्तीवर कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने शासकीय आरोग्य यंत्रणेवरही अधिक भार पडला. तरीही रुग्णांना चांगली सेवा देऊन त्यांचे जीव कसे वाचवता येतील, यासाठी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर धावपळ करत आहेत. तरीही काहीवेळा रुग्णांच्या नातेवाईकांकडून आरोप-प्रत्यारोप सहन करावे लागतात, अशी परिस्थिती आहे.

कोरोना महामारीमध्ये लुटीचा धंदा तेजीत चालला. एकीकडे सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत सेवा मिळत असली तरी अनेकजण आपल्या नातेवाईकांना खासगी वैद्यकीय व्यवसायिकांकडे नेण्यात धन्यता मानतात. उपचारासाठी पैसे नसले तरी चालतील, पण सरकारी वैद्यकीय सेवेपेक्षा खासगी वैद्यकीय सेवेवर अधिक विश्वास ठेवत असल्याचे दिसून येत आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे अधिक सोयीसुविधा असल्यानेही रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरु असेल, असेच म्हणावे लागेल. पैसे नसले तरी जीव वाचविण्यासाठी कर्ज काढून, मदत मागून लोक उपचाराचा खर्च भागवत आहेत.

कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारी आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण पडत आहे. त्याचाच गैरफायदा घेताना काही खासगी रुग्णालये दिसत आहेत. या महामारीच्या काळात खासगी रुग्णालयांकडून कोरोना प्रतिबंधक उपचारासाठी औषधे, ऑक्सिजन व सेवेचे दर शासनाने यापूर्वीच निश्चित केले असतानाही रुग्णांची होणारी आर्थिक लूट, पिळवणूक थांबविण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती केली असली तरी त्याचा काहीही परिणाम झालेला नाही.

- रहिम दलाल

Web Title: The patient robbery will never stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.