ग्रामीण भागातील खासगी कोविड सेंटरमध्ये रुग्णांची होतेय लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:22 AM2021-06-25T04:22:59+5:302021-06-25T04:22:59+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : कोरोना कालावधीत शहरासह ग्रामीण भागात खासगी कोविड सेंटर सुरू झाली. या सेंटरवर कोणाचेही नियंत्रण ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कोरोना कालावधीत शहरासह ग्रामीण भागात खासगी कोविड सेंटर सुरू झाली. या सेंटरवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. रूग्णसेवेच्या नावाखाली लुटमार सुरू आहे. प्रशासनातील काहींची त्यांच्यासोबत मिलीभगत असण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनावर अवलंबून राहाल तर परिस्थिती नियंत्रणात येणार नाही, असे खळबळजनक विधान उपसभापती प्रताप शिंदे यांनी बुधवारी झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत केले.
पंचायत समितीच्या सभापती रिया कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत शिंदे यांनी याविषयी मुद्दे मांडले. सदस्य हे लोकांच्या सेवेसाठी रूग्णालयात धावतात. मात्र, कोविड सेंटरमध्ये बिलाबाबत मनमानी सुरू आहे. अव्वाच्या सव्वा बिले केली जातात. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. नव्या शासकीय नियमांप्रमाणे बिलांची आकारणी केली जात नाही. काही रूग्णालयात गलिच्छ वातावरण आहे. स्वच्छतेचा मागमूस नाही. तरीही व्हीआयपी रूग्णालयासारखे चार्जेस आकारले जातात. रूग्णालयांची क्षमता नसतानाही रूग्णांना ॲडमिट करून घेतले जाते. केवळ कोरोना उपचाराच्या नावाखाली लोकांची लूट सुरू आहे. रूग्णांच्या नातेवाईकांनी लाखो रूपयांची बिले फेडली, तरी रूग्ण वाचलेले नाहीत. ज्या कोविड सेंटरनी लूट केली, तिथेच जास्त रूग्ण दगावले आहेत. त्यांच्यावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. केवळ शासकीय नियमाप्रमाणे बिलांची आकारणी केल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात वस्तूस्थिती मात्र वेगळी आहे. रूग्ण रुग्णालयातून सर्व बिले पेड केल्यानंतर घरी जातो. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा झालेल्या बिलाचे ऑडिट करते. त्यातून काही साध्य होत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. कोरोनाबाबत सदस्यांनी प्रशासनावर अवलंबून राहणे उपयोगाचे नाही. आपल्या परिसरातील गावागावात लोकांची वेळीच काळजी घ्यायला हवी. दरम्यान, शहरासह तालुक्यातील कोविड सेंटरची माहिती देण्याची सूचना उपसभापती शिंदे यांनी आरोग्य विभागाला दिली.
-----------------
सारेच मूग गिळून गप्प
कोरोना कालावधीत शासकीयसह खासगी रूग्णालयात दाखल झालेले रूग्ण आणि तेथे मृत्यू झालेल्या रूग्णांची माहिती देण्याची सूचना आरोग्य विभागाला देण्यात आली. मात्र, उपसभापती शिंदे यांनी कोविड सेंटरचा मुद्दा मांडल्यानंतर त्यावर ठराव अथवा सामूहिक चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, त्याला सदस्यांची फारशी साथ मिळाली नाही. राष्ट्रवादीचे सोडाच साधे शिवसेनेच्या सदस्यांनीही उपसभापतींच्या सुरात सूर मिसळून भाष्य केले नाही.