खेडमध्ये रुग्ण घटले, बेड्स उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:33 AM2021-05-19T04:33:08+5:302021-05-19T04:33:08+5:30
: लोकमत न्यूज नेटवर्क खेड : कोविडच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील रुग्णांच्या उपचारासाठी चार शासकीय कोविड उपचार केंद्रे सुरू आहेत. मात्र ...
:
लोकमत न्यूज नेटवर्क
खेड : कोविडच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील रुग्णांच्या उपचारासाठी चार शासकीय कोविड उपचार केंद्रे सुरू आहेत. मात्र सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. तालुक्यातील शासकीय यंत्रणेकडून २९१ बेड्स उपलब्ध आहेत आणि सध्या १२१ सक्रिय रुग्ण आहेत.
यावर्षी मार्च महिन्यापासून तालुक्यातील रुग्णसंख्या वाढू लागल्याने उपलब्ध बेडची संख्या अपुरी पडू लागली होती. राज्य सरकारने १५ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू केल्यानंतर गत महिन्याच्या कालावधीत वाढत्या रुग्ण संख्येवर नियंत्रण आले आहे. तालुक्यात कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालय ५०, शिवतेज आरोग्य संस्थेच्या कोविड सेंटर मध्ये १००, तर नगर परिषदेच्या कोविड केअर सेंटरमध्ये २१ तसेच लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात १२० अशी एकूण २९१ बेड्सची कोविड रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात ५०, शिवतेज आरोग्य संस्थेच्या कोविड सेंटर मध्ये ३९, तर नगर परिषदेच्या कोविड केअर सेंटर मध्ये ८ असे एकूण ९७ ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध आहे.
शासनाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या या रुग्णालयात कोविड रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. याव्यतिरिक्त खेड खोंडे येथील क्युअर कोविड हॉस्पिटल ३५ बेड, लोटे येथे वक्रतुंड हॉटेलमध्ये सुरू असलेले एसएमएस हॉस्पिटल ४० बेड व घरडा कंपनीचे डीसीएचसी ३० बेड अशी तीन खासगी डेडिकेटेड कोविड उपचार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. खासगी कोविड उपचार केंद्रात शासनाने निर्धारित केलेल्या दरात रुग्णांवर उपचार केले जात आहेत. शहरातील शासकीय कोविड केअर सेंटरची तपासणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्फत केली जाते, तर तालुक्यातील ग्रामीण भागातील कोविड सेंटरची तपासणी तालुका वैद्यकीय अधिकारी करतात.
तालुक्यात सद्यस्थितीत कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात ४२ , शिवतेज आरोग्य संस्थेच्या कोविड सेंटरमध्ये ४६, तर नगर परिषदेच्या कोविड केअर सेंटरमध्ये १३ असे एकूण १०१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. त्याचबरोबर खोंडे येथील क्युअर कोविड हॉस्पिटलमध्ये ६, लोटे येथे वक्रतुंड हॉटेलमध्ये सुरू असलेले एसएमएस हॉस्पिटल १३ व घरडा कंपनीचे डीसीएचसी एक या तीन खासगी उपचार केंद्रात एकूण २० रुग्ण उपचार घेत आहेत.
तालुक्यात आतापर्यंत ३६६८ इतके रुग्ण आढळले आहेत. सध्या त्यातील ३९५ रुग्ण सक्रिय आहेत. ३१३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर १३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.