अन्य आजारांचे रुग्ण भीतीने घरातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:40 AM2021-04-30T04:40:53+5:302021-04-30T04:40:53+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जगभरात कोरोनाने हाहाकार उडवून दिला आहे. सर्वत्र कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. सध्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जगभरात कोरोनाने हाहाकार उडवून दिला आहे. सर्वत्र कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. सर्वच ठिकाणी आता कोरोनाची तपासणी अनिवार्य करण्यात आल्याने आता इतर रुग्ण बाहेर उपचारासाठी जाण्यासाठीही घाबरू लागले आहेत. त्यामुळे सध्या रत्नागिरीतील खासगी रुग्णवाहिकांना गेल्या दोन महिन्यांत या रुग्णांना हलविण्यासाठी येणारे काॅल पूर्णपणे थांबले आहेत. मात्र, सध्या कोरोना रुग्णांना मुंबई, पुणे, कोल्हापूर आदी शहरांमध्ये हलविण्यासाठी दिवसरात्र भटकंती करावी लागत आहे.
सध्या सर्वत्रच कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहेत. पहिल्या लाटेतील कोरोनाच्या संसर्गापेक्षाही या दुसऱ्या लाटेचा संसर्ग अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या दिवसाला अगदी ८०० पर्यंत रुग्णसंख्या पोहोचू लागली आहे. संसर्ग रोखण्यासाठी शासनाने चाचण्या वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार आता सर्व शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये, विविध आस्थापना, दुकाने यामधील कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या अनिवार्य करण्यात आल्या आहेत. चाचण्या वाढल्याने कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढल्याचे दिसत आहे.
सध्या कुठल्याही रुग्णालयात अन्य आजाराचा नवीन रुग्ण गेल्यास उपचार करण्याआधी त्या रुग्णाची आरटीपीसीआर किंवा रॅपिड ॲंटिजेन चाचणी करणे सर्वच रुग्णालयांनी बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता रुग्णांना दुसऱ्या मोठ्या शहरांत हलवायचे झाल्यास त्याची कोरोना चाचणी करूनच न्यावे लागते. त्यामुळे आता हृदयविकार, मधुमेह, कॅन्सर यासारख्या आजाराबरोबरच विविध कारणांनी अस्थिभंग झालेल्या रुग्णांना दुसऱ्या शहरात उपचारासाठी नेताना कोरोना चाचणी करावी लागत असल्याने आपण पाॅझिटिव्ह आलो तर किंवा दुसऱ्या रुग्णालयात गेल्यावर कोरोनाबाधित झालो तर? ही भीती रुग्णांच्या मनात वाटत असल्याची शक्यता खासगी रुग्णवाहिकाचालकांकडून व्यक्त होत आहे. सध्या अन्य आजारांचे रुग्ण नसले तरी कोरोनाच्या रुग्णांना इतरत्र हलविण्यासाठी मात्र या रुग्णचालकांना दिवसरात्र खेपा माराव्या लागत आहेत.
अन्य रुग्ण घरातच...
सध्या हृदयविकार, कॅन्सर, अपघातात गंभीर जखमी आदी अन्य रुग्ण दुसऱ्या शहरातील मोठ्या रुग्णालयात जाण्याचे प्रमाण अल्प झाले आहे. गेल्या महिना - दीड महिन्यांपासून हे रुग्ण नेण्याची वेळ आली नाही. मात्र, कोरोना रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासाठी मात्र खासगी रुग्णवाहिकांवर प्रचंड ताण आल्याचे राजा ॲम्ब्युलन्सचे तन्वीर जमादार यांनी सांगितले.
कोरोना चाचणीची भीती
कुठल्याही रुग्णालयात गेल्यावर आता रुग्णाची कोविड चाचणी आधी करतात आणि नंतर उपचार करतात. त्यामुळे बहुधा अन्य रुग्णांना भीती वाटत असावी. कारण, गेल्या दोन महिन्यांपासून काेरोनाव्यतिरिक्त दुसऱ्या रुग्णाला रत्नागिरीबाहेर हलविण्यासाठी एकही काॅल आला नसल्याचे स्वामी ॲम्ब्युलन्सचे योगेश उतेकर यांनी सांगितले.
सध्या कोरोनाचेच रुग्ण
सध्या कोरोनाचेच रुग्ण कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे हलवावे लागत आहेत. तसेच जिल्ह्याच्या इतर तालुक्यांतून रत्नागिरीत आणण्यासाठी आता खासगी रुग्णवाहिकांना सतत पळावे लागत आहे. त्यामुळे दिवसांतून किती खेपा माराव्या लागतात, ते सांगता येत नाही. यासाठी सतत फोन वाजत असल्याचे शोभा ॲम्ब्युलन्सचे शुभम कीर यांनी सांगितले.