काेविड सेंटर नसल्याने राजापूरचे रुग्ण रत्नागिरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:33 AM2021-04-04T04:33:19+5:302021-04-04T04:33:19+5:30
राजापूर : यापूर्वी तीन वेळा कोविड मुक्त झालेल्या राजापूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने तालुक्यात कोविड सेंटर उपलब्ध ...
राजापूर : यापूर्वी तीन वेळा कोविड मुक्त झालेल्या राजापूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने तालुक्यात कोविड सेंटर उपलब्ध नसल्याने पॉझिटिव्ह रुग्णांना रत्नागिरीला हलवावे लागत आहे. राजापूर पंचायत समितीच्या मासिक सभेत तालुक्यात कोविड सेंटरबाबत प्रश्न उपस्थित केला हाेता. मात्र, अद्यापही तालुक्यात कोविड सेंटर सुरू करण्यात आलेले नसल्याने नाराजी व्यक्त हाेत आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर तालुक्यात रायपाटण येथील खापणे महाविद्यालयाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या इमारतीमध्ये प्रशासनाने कोविड सेंटर सुरू केले होते. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आवश्यक स्टाफ देण्यात आला होता. तालुक्याच्या विविध भागातील कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्णांना रायपाटणमधील कोविड सेंटरमध्ये दाखल केले जात होते. कोरोनाचा प्रभाव कमी होताच रायपाटणमधील खापणे महाविद्यालयाच्या वसतिगृहातील कोविड सेंटर बंद करण्यात आले. त्यानंतरच्या कालखंडात राजापूर तालुका कोरोनामुक्त झाला होता. मात्र, कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून, गेल्या काही दिवसांत तालुक्याच्या विविध भागात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत.
तालुक्यात कोरोना पुन्हा फैलावू लागला असून, सध्या जवळपास ३५ ते ४० ॲक्टिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यांना उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एकीकडे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे तालुक्यात कोविड सेंटर नसल्याने रुग्णांची परवड होत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.