देशभ्रतार यांची पुण्याला बदली
By admin | Published: March 2, 2016 11:00 PM2016-03-02T23:00:29+5:302016-03-03T00:04:30+5:30
जिल्हा परिषद : अविश्वास ठरावावरील चर्चेआधीच निर्णय
रत्नागिरी : शिवसेनेने फारच प्रतिष्ठेचा प्रश्न करून दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा होण्याआधीच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या अविश्वास ठरावावर महिला दिनीच ८ मार्चला बैठक बोलावण्यात
आली आहे. मात्र, आता या बदलीमुळे बैठकीतील हवाच गेली आहे.
देशभ्रतार यांनी दि. ९ एप्रिल २०१५ रोजी रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा पदभार स्वीकारला होता. जिल्हा परिषदेच्या कामात सुसूत्रता आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, विकासकामांच्या मुद्द्यावरून तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर व पदाधिकाऱ्यांशी नेहमीच खटके उडत होते. काही कामांमध्ये देशभ्रतार यांनी काटेकोरपणा आणल्यामुळे हे खटके उडाल्याची माहिती पुढे येत आहे. त्यावेळी राजापकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या. दरम्यानच्या कालावधीमध्ये शिवसेनेचे संपर्कप्रमुख विजय कदम यांनी देशभ्रतार यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची घोषणा केली होती. शिवसेनेने हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला असला तरी भाजप व राष्ट्रवादीने मात्र यातून दूर राहणे पसंत केले होते.
आठवडाभरापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी अचानक सर्वपक्षीय सदस्य एकत्र येऊन देशभ्रतार यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेऊन विशेष सभेची मागणी केली. त्याप्रमाणे अविश्वास ठरावासाठी ८ मार्चला नूतन अध्यक्ष तुकाराम तथा बुवा गोलमडे यांनी सभा बोलावली आहे.
काल मंगळवारी अचानक देशभ्रतार यांच्या बदलीबाबत मंत्रालय स्तरावर हालचाली सुरू होत्या. त्यानंतर बुधवारी सायंकाळी उशिरा त्यांच्या बदलीचे आदेश जिल्हा परिषदेत येऊन थडकले. त्यांची बदली पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार, हे मात्र जाहीर झाले नव्हते. (शहर वार्ताहर)