कोकण रेल्वे मार्गावर ९७४ कर्मचाऱ्यांची गस्त, १० जूनपासून पावसाळी वेळापत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 03:35 PM2020-06-06T15:35:10+5:302020-06-06T15:37:01+5:30
कोकण रेल्वे मार्गावर १० जूनपासून मान्सून वेळापत्रक लागू करण्यात आले असून १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी हे वेळापत्रक कार्यान्वित राहील. पावसाळयातील प्रवाशांंच्या सुरक्षितेसाठी कोकण रेल्वे सर्व त्या सुरक्षा उपायांसह सज्ज झाली आहे. या कालावधीत ९७४ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मार्गावर २४ तास गस्त राहणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १० जूनपासून मान्सून वेळापत्रक लागू करण्यात आले असून १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी हे वेळापत्रक कार्यान्वित राहील. पावसाळयातील प्रवाशांंच्या सुरक्षितेसाठी कोकण रेल्वे सर्व त्या सुरक्षा उपायांसह सज्ज झाली आहे. या कालावधीत ९७४ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मार्गावर २४ तास गस्त राहणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे
लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तू आणि श्रमिकांच्या घरवापसीसाठी अहोरात्र मेहनत घेतलेल्या कोकण रेल्वेने याच कालावधीत आपली मान्सूनपूर्व सुरक्षा उपाययोजनांची कामेही पूर्ण केली आहेत. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेकडून कोलाड ते ठोकूर या आपल्या ७४० किलोमीटरच्या पट्ट्यात मान्सून पूर्व कामांना काही दिवसांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती.
पावसात कोकण रेल्वे मार्गावर पाणी येऊ नये, यासाठी पाण्याचे मार्ग मोकळे करणे आणि मार्गानजीकच्या कटिंगची पाहणी करून धोकादायक वाटणारी कटिंग काढून टाकणे, याला प्राधान्य देण्यात आले. गेल्या काही वर्षात पावसाळापूर्व उपाययोजनांमुळे गेल्या सात वर्षात मार्गावर दरड व माती येण्याचे प्रकार खूप कमी झाले आहेत.
धोकादायक कटिंग आहेत, अशा ठिकाणी विशेष उपाययोजना केल्या असून या ठिकाणी २४ तास कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहेत. अशा ठिकाणांवर रेल्वेचा वेगही नियंत्रित ठेवण्यात येणार आहे. आपत्कालीन स्थितीत तत्काळ मदत मिळावी यासाठी ठराविक अंतरांवर पोकलेन मशिन्स सारखी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
मुसळधार पावसाच्या काळात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्याची खबर देणारी यंत्रणा मार्गावर तीन पुलांवर ठिकाणी सुसज्ज आहे. पुराचे पाणी धोकादायक पातळीच्या वर आल्यास ही यंत्रणा सतर्क करते. माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडपी येथे पर्जन्यमापक यंत्रणा मार्गावरील ९ स्थानकांमध्ये सुसज्ज असून, अतिवृष्टी काळात ही यंत्रणा सूचना करेल.
मान्सूनच्या काळात बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव या तीन ठिकाणी नियंत्रण कक्ष २४ तास रेल्वेच्या सुरक्षित वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी कार्यरत राहणार आहे. पावसाळयातील सुरक्षित प्रवासासाठी कोकण रेल्वे सर्व सुरक्षा उपायांसह सज्ज झाली आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आहे.